लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना मनपा प्रशासनाने नुकसानभरपाईची रक्कम भरण्याचा सूचना दिल्यानंतर, शहरातील १५ अव्यावसायिक मार्केटमधील सुमारे १५०० गाळेधारकांनी शुक्रवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. १५०० गाळेधारक संपावर जाणार असून, मनपा प्रशासनाने गाळे सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. तर कुटुंबासह मनपासमोर आंदोलन करण्याचा इशारा गाळेधारकांनी दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या अवाजवी बिलांची रक्कम कमी करावी, तोपर्यंत रक्कम भरली जाणार नाही, असाही इशारा गाळेधारकांनी दिला आहे.
महापालिका प्रशासनाने गाळेधारकांना दिलेली बिले ही अवाजवी स्वरूपाची आहेत. १४ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांना थकीत भाड्याची जी बिले मिळाली आहे. ती अवाजवी असून, या मार्केटमधील गाळेधारकांनी ही बिले भरणे शक्यच नाही. या मार्केटमधील गाळेधारकांचा महिन्याला जेमतेम व्यवसाय होतो. त्यातच लाखोंची बिले देणे म्हणजे गाळेधारकांवर उपासमारीचीच वेळ येणार आहे. प्रशासनाला सूचना, निवेदने देऊनदेखील प्रशासनाने गाळेधारकांची बाजू ऐकून घेतलेली नाही. त्यातच पुन्हा प्रशासनाकडून गाळेधारकांना धमकी देऊन ही बिले भरण्याचा सूचना दिल्या जात आहे.
तर कोरोनाचा विचार करणार नाही
गाळेधारकांचा थकबाकीची रक्कम भरण्यास नकार नाही, मात्र ती रक्कम अवाजवी स्वरूपात नको पाहिजे. तसेच २०१२ च्या भाडेपट्ट्याप्रमाणे ती रक्कम असल्यास ती रक्कम भरण्यास गाळेधारक तयार आहेत. मात्र, मनपाकडून सद्याचा रेडीरेकनरच्या दरानुसार या बिलांची आकारणी केली जात आहे. शुक्रवारी केवळ काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असून, मनपाने कारवाई केल्यास कोरोनाचा कोणताही विचार न करता कुटुंबासह आंदोलनाचा इशारा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिला आहे.
या १५ मार्केटचा राहणार सहभाग
रामलाल चौबे मार्केट, भोईटे मार्केट, जुने बी.जे. मार्केट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, वालेचा मार्केट, छत्रपती शाहू महाराज मार्केट, शिवाजीनगर दवाखान्यातील गाळे, महात्मा गांधी मार्केट, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानलगतचे गाळे, नानीबाई अग्रवाल मार्केट, जुने शाहू मार्केट, धर्मशाळा मार्केट.