लोकमत न्युज नेटवर्क
जामनेर : ‘कोरोनाकाळात मुलांसाठी कविता’ हे पुस्तक म्हणजे कोरोनाकाळात फुलवलेली फुलबाग होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी केले.
कवी वीरभद्र मिरेवाड हे उपक्रमशील शिक्षक आणि सर्जनशील लेखक असून, कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात यत्किंचितही विचलित न होता त्यांनी आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेने विद्यार्थ्यांसाठी " कोरोनाकाळात मुलांसाठी कविता" हा कवितासंग्रह प्रसिध्द केला. या संग्रहाचे प्रकाशन कोळी यांचे निवासस्थानी झाले. सविता कोळी, गणगोत प्रकाशनचे पांडुरंग पुठ्ठेवाड, डॉ. विवेकानंद कुसंगवार, स्वप्निल कोळी, गोपाल इंगळे आदी यावेळी उपस्थित होते.
या कवितासंग्रहात विजया वाड, डॉ. अशोक कोळी, उत्तम कोळगावकर यांच्यासह ४९ कवींच्या कविता आहेत.
-------------------------------------------------
यू-ट्यूबवर कवितांची धमाल
कवी वीरभद्र मिरेवाड हे नायगाव (जिल्हा नांदेड) येथील असून, त्यांनी प्रथितयश कवींशी संपर्क साधून त्यांच्या आवाजातील कवितांचे व्हिडिओ मागविले. कवितांचे व्हिडिओ संपादित करून ते यू-ट्यूब चॅनलवर अपलोड केले. जेणेकरून कोरोनाकाळात घरातच अडकून राहिलेल्या मुलांच्या रटाळ जीवनात काही आनंदाचे क्षण येतील. यू-ट्यूबची लिंक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली.
विद्यार्थ्यांनीदेखील या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.
-------------------------------------------------
फोटो कॅप्शन
"कोरोनाकाळात: मुलांसाठी कविता" या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना अशोक कोळी, पांडुरंग पुठ्ठेवाड, डॉ. विवेकानंद कुसंगवार, सविता कोळी.
११/२