जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुदत संपत असून, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे हे काम लांबले आहे. ३० जून २०२१ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी दिली.
जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या जागी गेल्या वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वेतर्फे नवीन उड्डाणपुल बांधण्यात येत आहे. मात्र, सुरूवातीपासूनच हे काम संथ गतीने होत असल्यामुळे, मुदत संपत येत असतानांही हे काम पूर्ण झालेली नाही. पुढील वर्षी १२ फेब्रुवारी रोजी या कामाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, आता पर्यंत बीम उभारण्याचेच काम पूर्ण झाले असल्यामुळे, हे काम पूर्ण व्हायला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
इन्फो :
या कारणांमुळे कामाला विलंब झाल्याचा दावा :
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. विविध कारणांमुळे या कामाला विलंब झाल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात येत आहे. यामध्ये कामाच्या सुरूवातीलाच रेल्वेचे `गर्डर` काढण्यासाठी पुलावर क्रेन उभी करण्यात येणार होती. त्यामुळे रेल्वेच्या सुचनेनुसार क्रेनसाठी पुल तोडण्याचे काम थांबविण्यात आले होते. तसेच गर्डर काढण्यासाठी मेगाब्लॉकची वेळ मिळत नसल्यामुळे, दोन महिने हे काम उशिराने सुरू झाले.
- त्यानंतर कामाला सुरूवात झाल्यानंतर सहाच महिन्यात कोरोनाचा संसर्ग आला. या कोरोनामुळे शासनाच्या सुचनेनुसार मार्चपासून काम बंद होते. त्यानंतर ऑक्टोंबर पासून या कामाला सुरूवात झाली. कोरोनामुळे सहा महिने हे काम थांबले असल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.
- तसेच पुलाच्या बाहेरील कामासाठी मनपा पाईपलाईन व महावितरणचे खांब अडथळा ठरत आहेत. दोन वर्षापासून हे दोन्ही अडथळे हटविण्यात न आल्यामुळे बाहेरील कामाला दिवसेंदिवस विलंब होत असून, बाहेरील काम पूर्णत : थांबले आहे. अशा प्रकारे वरील कारणांमुळे कामाला विलंब झाला असल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.
कॅप टाकण्याचे काम पूर्ण :
उड्डाणपुलाच्या सध्याच्या कामाच्या प्रगतीबाबत कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी सांगितले की, सध्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी पाईल्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, आता पाईल्स कॅप भरण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर गर्डर व स्लॅब टाकण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
इन्फो :
कोरोनामुळे कामाची मुदत वाढवणार
कोरोनामुळे उड्डाणपुलाच्या कामाला विलंब झाला आहे. त्यामुळे शासनाच्या सुचनेनुसार शहरात सुरू असलेल्या सर्व शासकीय कामांना सहा वाढवून देण्याची सुचना करण्यात आली आहे. त्यानुसार शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामालाही १२ फेबुवारीला मुदत संपल्यानंतर पुढे सहा महिन्यांची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी सांगितले.