जळगाव - लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे आपल्याला काम करायचे आहे. त्यांच्या लग्नात आपला साखरपुडा लावून घ्यायचा आहे. त्याचसोबत विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे व्हिजन समोर ठेवून लोकांपर्यंत आपले काम पोहचवा. आपला प्रचार व प्रसार वाढवा, असा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला.
शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव तालुका मेळाव्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना मंत्री पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा प्रमुख नीलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय भावसार, माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, मुकुंद नन्नवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या विधानसभेत भाजपाने तुमच्या विरोधात उमेदवार उभा केला, त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारासाठी कामे कशा साठी करायचे असा सवाल जिल्हा प्रमुख पाटील, भावसार यांनी केला. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली हे खरे आहे, पण आता तसे होणार नाही. त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून देण्याचे काम आपण सर्वांना करायचे असल्याचे सांगत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांवर मलमपट्टी लावली.
बुथ रचना वाढवाआपल्या मित्र पक्षांची बुथ रचना किती मजबूत आहे, हे आपण बघितले पाहिजे. आपण बुथ रचना तसेच प्रचार व प्रसारामध्ये कमी आहोत. त्यामुळे आपण संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा, बुथ रचना तयार करा आदी सूचना त्यांनी दिल्या.