जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता नागरीकांना काही बंधने पाळावीच लागतील, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हावासियांना केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची तातडीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी तुकारात हुलवळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ रावलानी यांचेसह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
राज्यातील अकोला, नाशिक, अमरावती, नागपूर, जळगावसह काही जिल्हयात कोरोनाचे पुन्हा रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांचेशी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील टास्क फोर्सला सुचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांची बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करुन तातडीने काही बंधने लावण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणेला दिले.
नो मास्क नो एंट्री पुन्हा लागु
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे सार्वजनिक आणि गर्दीच्या याठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिलेत. जे नागरीक मास्क वापरणार नाहीत, त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस विभागास दिले.
कार्यक्रमांसाठी फक्त १०० लोकांनाच परवानगी द्या
नागरीकांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, महापालिका, नगरपालिका, पोलीस विभागाने गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी देतांना १०० व्यक्तींची मर्यादा ठरवून द्यावी, अन्यथा अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात येवू नये. परवानगी दिलेल्या कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होत असल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी. विना मास्क तसेच सामाजिक अंतराचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत.