ठिकठिकाणी साचला कचरा
जळगाव : पिंप्राळ्यातील काही भागांमध्ये कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. अनेक दिवसांपासून कचरा पडून असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अमृत योजनेंतर्गत खोदलेल्या खड्डयांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे तत्काळ योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.
दिवसा शुकशुकाट, सायंकाळी गर्दी
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी तीन दिवस कडक निर्बंध घातले होते. परिणामी, रस्ते ओस पडलेले पहायला मिळाले. दरम्यान, निर्बंध उठण्याच्या एक दिवसाआधी मंगळवारी दिवसात रस्ते ओस पडलेले होते. मात्र, सायंकाळी नागरिकांची खरेदीसाठी चांगलीच गर्दी झालेली बघायला मिळाली. सोबत विनाकारण फिरणारेसुद्धा यावेळी दिसून आले.
दुचाकी घसरून अपघात
जळगाव : खोटेनगर परिसरातील रस्त्याच्या कडेला पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दुचाकीस्वारास कुठलीही दुखापत झाली नाही, पण दुचाकीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले होते. रस्त्यांच्या थातूरमातूर दुरुस्तीमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे.