आनंद सुरवाडे जळगाव : गरीबी व हलाखीच्या परिस्थितीने अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली व त्यांच्यासाठी काहीतरी करावे, हा विचार मनात घेऊन वंचितांना शिक्षण देण्याचा विडा उचलला व आज १३ मुले दत्तक घेतली, अनेकांना क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण दिले व आठ मुले आॅलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकाची विजेतीही ठरली़ २४ वर्षाच्या अविनाश जावळे या तरूणांने अगदी कमात केलेले हे समाजकार्य आदर्श ठरले आहे़शनिपेठ भागातील रहिवासी असलेल्या अविनाश जावळे या तरूणाने डिएडचे शिक्षण घेतले आहे़ या शिक्षणाचा खरा उपयोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हावा, हे ध्येय मनाशी बाळगून अविनाशने वाढदिवसाला अशा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याचे ठरविले़ हा खर्च शाळेतील मुख्याध्यापकांकडे तो सुपूर्द करतो, अशा पद्धतीने त्याने १३ विद्यार्थी दत्तक घेतले़ यासह तो क्लासेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने शिक्षण देत आहे़ लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओढ लागावी म्हणून सामान्य ज्ञानाचे धडे तो देत असतो़ आॅडीओच्या माध्यमातून तो हे शिक्षण देत आहे़ आगामी काळात गणिते कशी सोडवावीत, पाढे लवकर कसे लक्षात ठेवावे, यासंदर्भात एक पुस्तक लिहीणार असल्याचा मानसही त्याने व्यक्त केला.गेल्या दीड वर्षांपासून अविनाश हा त्याचे बंधू धिरज जावळे, सुलतान पटेल व धनंजय सोनवणे यांच्या सहकार्याने साठ वर्ष व त्यावरील गरीब निराधार व गरजूंना अन्नदान करीत आहे़ पत्र्या हनुमान मंदिर, रेल्वेस्थाक, बसस्थानक आदी ठिकाणी बाहेर रस्त्यावर असलेल्या गरजू लोकांना या व्हॅनमधून अन्न पोहचविले जाते़ एखाद्या समारंभातील शिल्लक अन्न घेऊन ते वाटप करण्यात येते, ज्या दिवशी समारंभ नसतो त्यादिवशी अन्नसाखळीच्या माध्यमातून हा अन्नपुरवठा केला जातो़ मात्र, गेल्या दीड वर्षापासून नित्यनियमाने भुकेल्या गरजुंचे पोट भरण्याचे आदश कार्य या फूड बँकेच्या माध्यमातून होत आहे़तरूणांनी आपल्यातील कौशल्याचा उपयोग समाजातील गरजू, निराधारांच्या उद्धरासाठी करावा, वंचितांना शिक्षण द्यावे, तेव्हा त्या कौशल्याचा समाजहितासाठी व देशहितासाठी उपयोग होणे गरजेचे आहे़-अविनाश जावळे, निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, उपमुख्याध्यापक, पाळधी स्कूल
भुकेल्यांना अन्न, वंचितांना शिक्षण देणारा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 1:06 PM