जळगाव - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या क्षणीक सुखासाठी शिवसेना संपवण्याचे काम केले असून, उद्धव ठाकरेंना आज त्याची किंमत चुकवावी लागत आहे. आता केवळ तथ्यहीन भाषण करण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. त्यांची भाषणं मी फारसे मनावर घेत नाही असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
भाजपच्या जिल्हा बैठकीनंतर गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यविर सावरकर यांचा अपमान करत आहेत. मात्र, ज्या सावकरांच्या नावावर राजकारण उद्धव ठाकरे करतात, ते मात्र राहुल गांधींना केवळ तंबी देतात. जर सावरकरांबाबत प्रेम असेल तर कॉग्रेससोबत असलेली युती तोडून बाहेर निघा असेही महाजनांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आधीच हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असून, आता सावरकरांना देखील ते सोडत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. ठाकरेंचे सावरकरांबाबतचे प्रेम हे दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे ठाकरे आता जुनेच मुद्दे मांडत आहेत. त्यांची शिवसेना केवळ नावालाच असून, केवळ उसणे माणसं सभेत आणण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचाही आरोप महाजनांनी केला.
युतीतील जागांबाबत वादविवाद नाही, सर्व निर्णय दिल्लीहून होईलभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना शिंदे गटाला ४८ जागा देण्याबाबतचे वक्तव्य केले होते. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, प्रदेशाध्यक्ष आपल्या भाषणात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा यासाठी बोलले होते. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. युतीतील जागांबाबत कोणताही वादविवाद नाही. याबाबतचा सर्व निर्णय हा वरिष्ठ नेतेच घेतील. सर्व निर्णय हे दिल्लीहूनच होतील असेही महाजनांनी सांगितले.