प्रशांत भदाणे
जळगावविधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ खडसेंचा विजय व्हावा म्हणून खडसे समर्थकांनी पायी वारी करत हनुमानालाच साकडं घातलंय. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरसाळा हनुमान मंदिरावर सोमवारी खडसे समर्थकांनी पायी वारी काढली होती. विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा विजय व्हावा तसंच त्यांना मंत्रिपद मिळावं, अशा प्रकारचं साकडं खडसे समर्थकांनी हनुमानाला घातलं.
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सलग 30 ते 35 वर्षे प्रतिनिधित्व केलंय. याच मतदारसंघात मोडणाऱ्या बोदवड तालुक्यात देखील खडसेंचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलीये. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात असून, त्यांच्या समोर भाजपचं मोठं आव्हान आहे. याच अनुषंगाने खडसेंना यश मिळावं म्हणून बोदवड तालुक्यातील खडसे समर्थकांनी हनुमानाला साकडं घातलंय. खडसे यांच्या समर्थकांनी बोदवड ते शिरसाळा हनुमान मंदिर अशी 11 किलोमीटरची पायी वारी करत व हनुमानाची महापूजा करत खडसे यांच्या विजयासाठी देवाकडे साकडं घातलं.
मंत्रिपदाचीही व्यक्त केली अपेक्षा-
विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा विजय होऊन त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी प्रार्थनाही खडसेंच्या समर्थकांनी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी एकनाथ खडसे हे एकमेव नेते आहेत, त्यामुळे त्यांचा विजय व्हावा व त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी प्रार्थना खडसे समर्थकांनी केली.