जळगाव - शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा राज्य कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारात या पुरस्कारांचे वाटप केले जात होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वाटपच झाले नसून, जिल्हा कृषी विभागाने पाठविलेले तीन वर्षांपासूनचे प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळखात पडून आहेत.
जळगाव जिल्ह्यातून गेल्या तीन वर्षांत ३० हून अधिक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, शेतकरी आपले प्रस्ताव तयार करून, जिल्हा कृषी विभागाकडे पाठवीत आहेत, तर कृषी विभागदेखील हेच प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवीत आहेत. मात्र, राज्य शासनाला कृषी पुरस्कारांसाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अनेक शेतकरी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे काम करत आहेत. शेतकरी गट, शेतकरी कंपनीच्या माध्यमातूनही अनेक शेतकऱ्यांनी शेतीत आगळेवेगळे काम सुरू ठेवले आहे. अशा शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने १३ प्रकारांत पुरस्कार दिले जात असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत.
या तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण नाही...
२०१९-२०२०२०-२१
२०२१-२२
२०१८-१९ चे पुरस्कार २०२१ मध्ये करण्यात आले वितरित
२०१७, १८ व १९ या तीन वर्षांतदेखील पुरस्कार रखडले होते. मात्र, ३१ मार्च २०२१ रोजी हे पुरस्कार महाविकास आघाडीच्या काळात वितरित करण्यात आले होते. त्यात धुळे जिल्ह्यातील तीन, तर जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश होता. मात्र, त्यानंतर तीन वर्षांपासून कृषी विभागाकडून केवळ प्रस्ताव जमा करून, ते राज्याकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. यंदाही प्रस्ताव मागवले आहेत. प्रस्ताव देणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र पुरस्कार कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे.
कृषी विभागाकडे ज्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते ते प्रस्ताव कृषी विभागाकडून राज्य स्तरावर पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात येतील.-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक