वाघडू, ता. चाळीसगाव : गेल्या दोन दिवसांत जेमतेम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतात पिकांना जाड मटेरिअल व युरिया मारणे गरजेचे असल्याने चाळीसगाव शहरात युरिया घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. याचाच फायदा घेऊन काही दुकानदार दरवर्षीप्रमाणे दोन गोणी जाड मटेरिअल घ्या, तरच एक गोणी युरिया मिळेल, अशी अट घालत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अनेक शेतकरी निराश होऊन घरी परत जात आहेत. पुन्हा त्याच दुकानदारांशी संबंध येणार असल्याने ते तक्रार देण्यास पुढे येत नाही. याचाच फायदा दुकानदार उचलत असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी बनावट खतांचा साठा कृषी विभागाने जप्त केला होता. अशाच प्रकारे कोणी बनावट खते विक्री करीत आहेत का, याची तपासणीदेखील कृषी विभागाने करावी, अशी मागणी होत आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
असा काेणताही नियम नाही : कृषी विभाग
जाड मटेरिअल घेतले तरच युरिया मिळेल असा नियम आहे का, याबाबत पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव यांच्याकडून माहिती घेतली असता तसा नियम नाही व शेतकऱ्यांनी युरियासोबत जाड मटेरिअल घेतले पाहिजे, असेही नाही. शेतकऱ्यांनी संबंधित दुकानाची तक्रार कृषी विभागाकडे करावी .त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.