जळगाव/ नशिराबाद : कारमधून आलेल्या चौघांनी नशिराबाद शिवारातील शेतातून जबरदस्तीने कलिंगड घेऊन शेतकऱ्याला मारहाण करून, त्यांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याची घटना २८ मार्च रोजी घडली. या प्रकरणी बाळू चाटे, विठ्ठल पाटील, सुपडू सोनवणे आणि एक अनोळखी व्यक्ती (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील नशिराबाद येथील शेतकऱ्याचे सुनसगाव रोडवरील त्यांच्या मामाचे शेत आहे. त्या शेतात त्यांनी कलिंगडची शेती केली आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी कारमधून बाळू चाटे, विठ्ठल पाटील, सुपडू सोनवणे आणि एक अनोळखी व्यक्ती (पूर्ण नाव माहीत नाही) चौघेजण शेतात आले. त्यावेळी शेतकरी व त्याची मुलगी शेतात काम करत होते. चौघांनी शेतकरी यांच्याकडे कलिंगड मागितले. त्यांनी काहीही न ऐकता, चौघांनी शेतातील ८०० रुपये किमतीची कलिंगड तोडली. नऊ कलिंगडांचे पैसे मागितले असता, चौघांनी पैसे देण्यास नकार दिला. तर यातील चौघांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली, तर चौघांनी शेतकऱ्याच्या मुलीला अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजेंद्र साळुंखे करीत आहे.