लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येत आहे, शहरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यासह पुढील चार दिवस जिल्हाभरात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारीदेखील शहरात ढगाळ वातावरण कायम होते. शहरात दिवसभर ताशी २४ किलोमीटर वेगाने वारे वाहात होते.
अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. काही ठिकाणी रब्बीच्या पिकांची काढणी सुरू आहे तर काही ठिकाणी अद्याप गहू, हरभरा व दादर करण्यात आलेली नाही. त्यात पाऊस झाला तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीदेखील १७ मार्च ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच जिल्ह्यात २४ ते ३० किमी वेगाने वारे वाहात असल्याने केळी व दादरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
अवकाळी पावसाचे काय आहे कारण
ओडिसा, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि पूर्व भारतातील ईशान्य भारतातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व हालचाली सुरू आहेत, यालाच नॉर्वेस्टर इफेक्ट् म्हणून ओळखले जाते. याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी १८ ते २० मार्च आणि २१ ते २४ मार्च दरम्यान ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नॉर्वेस्टर इफेक्टच्या हालचाली एप्रिल ते जून महिन्यात साधारणतः पाहायला मिळतात, पण यावेळी त्या आधी होत आहेत. त्यामुळे जिथे प्रभाव जास्त असेल तिथे नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे. जळगाव विभागात प्रभाव अत्यल्प राहण्याची शक्यता आहे.
कोट..
यावर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे हे बदल जाणवत आहेत. जिल्ह्यात पावसाची शक्यता असली तरी त्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतकेच आहे.
- नीलेश गोरे, हवामानतज्ज्ञ