पारा ४५ अंशांचा पार जाण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. जळगाव शहराचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचला असून, पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. २३ ते २८ एप्रिल जिल्ह्यात तापमानाचा कहर निर्माण होण्याची शक्यता असून, या काळात तापमान ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तसेच काही दिवस ढगाळ वातावरण कायम झाल्याने तापमानातदेखील घट झाली होती. शहराचा पारा गेल्या आठवड्यात ३८ अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र पुन्हा तापमानात वाढ होऊन तापमान आता ४१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. उत्तर भारतातील राजस्थान व गुजरात या भागाकडून उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. यामुळे लूसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, तापमान या हंगामातील उच्चांक गाठण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत तापमान वाढले तर दुपारच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्यांना काहीअंशी चाप बसतो. मात्र तापमानाचा वाढीमुळे कोरोना सोबतच नागरिकांना उष्माघाताचा धोकादेखील वाढला आहे. यामुळे नागरिकांनी काही दिवस घरातच राहून बाहेर विनाकारण फिरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान सर्वाधिक तापमान
शहरात सकाळी ९ वाजेपासूनच तापमानात वाढ होत असून, रात्री ८ वाजेपर्यंत उष्ण झळांनी नागरिकांना घरात बसणेदेखील कठीण झाले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता शहराचा पारा सर्वाधिक ४१ अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे या काळात नागरिकांनी घरातच थांबण्याची गरज आहे. यासोबतच शहरात गेल्या आठवडाभरापासून ताशी १२ ते १४ किमी उष्ण वारे वाहत असून, यामुळेदेखील उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घरातून निघताना कानावर रुमाल लावूनच निघाले असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मे महिन्यात मात्र अवकाळीचे संकट
एप्रिलअखेरपर्यंत जिल्ह्यात तापमानाचा कहर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, तर १ मेनंतर पुन्हा जिल्हाभरात अवकाळी पावसाचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे. जागतिक हवामानात बदल होत असल्याने त्याचा परिणाम वातावरणाचा हंगामावर होताना दिसून येत आहे. तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढून चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, यामुळे जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मेअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.