लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र राज्य विधान मंडळातील आमदारांची अंदाज समिती २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान जिल्हा दौऱ्यावर असून, समितीकडून विविध शासकीय कार्यालयामध्ये जाऊन शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या विनियोगाबाबत आढावा घेतला जाणार आहे. या समितीच्या दौऱ्यांतर्गत २४ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन भवनमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर समिती कोठे जाणार आहे, कशाची पाहणी करणार आहे, असा एकूण दौरा स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून योजनांची माहिती घेण्यासाठी राज्य विधान मंडळातील आमदारांची अंदाज समिती २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान जिल्हा दौऱ्यावर आहे. ३० सदस्यांच्या या समितीमध्ये एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांचाही समावेश आहे. २४ रोजी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील विभागप्रमुखांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर २४ रोजी दुपारपासून ते २६ ऑगस्टपर्यंत महसूल प्रशासनासह वन विभाग, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकास परिषद, जलसंपदा विभाग, पर्यटन विभाग, महावितरण, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध शासकीय कार्यालयांमधील योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.
या समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच कार्यालयांमध्ये तयारी करण्यात आली. यासोबतच विश्रामगृहांमध्येदेखील नवीन चादर, बेडशीट व इतरही नवीन उपाययोजना करण्यात आल्या. यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील तुटलेल्या फलकाचीही डागडुजी करण्यात आली.