ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - सिंथेसायझरच्या भावस्पर्शी मैफलीतून संगीत आणि शांतीची अनोखी सांगड घालत आनंद, कारुण्य, दु:खाच्या विविध छटा शनिवारी जळगावकरांना अनुभवायला मिळाल्या. निमित्त होते म्युङिाकोलॉजी विषयातील ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ इमिरेटस् प्रोफेसर डॉ. मार्क लिण्डले यांच्या कीबोर्ड वरील संगीत मैफलीचे. कोलंबिया विद्यापीठ, न्यूयार्क विद्यापीठ व जागतिक पातळीवरील इतर विद्यापीठांमध्ये म्युङिाकोलॉजी विषयातील ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या डॉ. लिण्डले यांच्या या मैफलीचे शनिवारी जळगावातील भाऊंचे उद्यानात आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त दलुभाई जैन यांनी डॉ.लिंडले यांचे सुती हार व पुस्तक देऊन स्वागत केले.या वेळी शांतीची प्रचिती आणणारे, प्रभू येशू ख्रिस्त यांना क्रुसावर चढविल्यानंतरच्या दु:खाचे प्रसंग, जर्मनीमधील 19व्या शतकातील प्रतिभाशाली संगीतकार म्हणून गणल्या गेलेल्या जॉन सेबॅस्टीयन बाख यांच्या जीवनातील विविध सुख-दु:खाचे प्रसंग त्यांनी संगीतातून मांडले. त्यांच्या अनोख्या शैलीने जळगावकरांना चांगलेच खिळवून ठेवले होते. भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांची तुलना डॉ. लिण्डले यांनी केली. जॉन सेबॅस्टीयन बाख यांच्या कार्याबद्दलही माहिती दिली. त्यांचा मराठी अनुवाद गांधी रिसर्च सेंटरचे सहकारी विनोद रापतवार यांनी करून दिला. जॉन सेबॅस्टीयन बाख यांची ध्वनीमुद्रीत रचना या वेळी ऐकविण्यात आली. या कार्यक्रमास जळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहका:यांनी परिश्रम घेतले.