कोरोना परिणाम : स्थानिक प्रवाशांना जागा मिळेना, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
रेल्वे गाड्या हाऊस फुल्ल : सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने, दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यात शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी लागू केल्यामुळे परप्रांतीय बांधवांनी घराची वाट धरल्याने मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या सर्व गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी यामुळे स्थानिक प्रवाशांना जागा मिळत नसून, गर्दीमुळे गाडीत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत असल्याचे सोमवारी ''लोकमत'' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.
संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. विशेषतः मुंबईतील हॉटेल व्यवसायात मोठ्या संख्येने परप्रांतीय बांधव काम करीत असून, आता या संचारबंदीत हॉटेल व्यवसायही बंद असल्यामुळे ते आपल्या घराकडे परतू लागले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईहून जळगावमार्गे उत्तर भारतात, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली व बिहारकडे जाणाऱ्या काशी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, पंजाब मेल या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी यामुळे स्थानिक प्रवाशांना गाडीत जागा मिळत नसल्यामुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. विशेषतः यामुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
डब्यात सोशल सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना रेल्वेच्या आरक्षण डब्यातच प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना अल्प प्रतिसाद
एकीकडे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत असतांना दुसरीकडे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची अत्यल्प गर्दी दिसून येत आहे. विषय म्हणजे नेहमी गर्दी असणाऱ्या कामायनी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस व महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या या गाड्यांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांकडून आरक्षण होत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
मुंबईत राहून काय करणार
''लोकमत'' प्रतिनिधीने परप्रांतीय बांधवांशी संवाद साधला. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत अत्यंत कडक निर्बंध लागू आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. संचार बंदीत मुंबईतील बाजारपेठ व हॉटेल व्यवसाय बंद असल्याने आमचा रोजगार बंद झाला आहे. हाताला काम नसल्याने मुंबईत राहून काय करणार, मुंबईची महागाई पाहता त्या ठिकाणी रोजगार नसताना राहणे सोयीचे नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत आम्ही गावी जात असल्याचे या परप्रांतीय बांधवांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले.