जळगाव : बीएचआरमध्ये आर्थिक घोटाळा उघड झाल्यानंतर राज्यभर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात अनेकांचा सहभाग वाढल्याने हे प्रकरण सीआयडीकडे गेले. यात सीआयडीने फॉरेन्सिक ऑडिट केले असून, अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सत्र आणखी वाढवले आहे. उद्योजक प्रेम कोगटा, भागवत भंगाळे यांच्यासह अटकेतील ११ जणांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
फेब्रुवारी २०१५मध्ये पहिला गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर राज्यभर तब्बल ८१ गुन्हे दाखल झाले. गुन्हे व आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती पाहता शासनाने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले. संस्थेत नेमका अपहार किती, कशाप्रकारे झाला, ठेवीदारांच्या ठेवी कशा वळविल्या, किती कर्जदारांनी कर्ज घेतले, किती जणांनी परतफेड केली. संस्थेला नफा किती व तोटा किती झाला याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सीआयडीने न्यायवैद्यक आंतरलेखापरीक्षण केले. या लेखापरीक्षणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अधिकार नसताना अमर्याद व विनातारण कर्जवाटप केल्याचे उघड झालेले आहे.संस्थेच्या १९व्या वार्षिक अहवालानुसार संस्थेचे २४ हजार १५८ सभासद होते.
संचालकांकडून बेकायदा अमर्याद कर्जवाटप
अहवालानुसार, संस्थेने पोटनियमांचा भंग करून संचालकांनी बेकायदेशीररीत्या अमर्याद विनातारण कॅश क्रेडिट, टर्म व वाहन कर्जवाटप केलेले आहे. हा अहवाल तयार होईपर्यंत बेकायदेशीररीत्या कर्ज घेतलेल्या व थकीत असलेल्या कर्जदारांची यादीच या अहवालात देण्यात आलेली आहे. आता हीच कर्जफेड करताना ठेवीदारांचे नुकसान करून त्यांच्या पावत्या समायोजित करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.