लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी रामदेववाडी ता. जळगाव येतील वनविभागाच्या कक्ष क्रमांक ४१५ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून एकुण १७ हेक्टरवर रोपवन उभे करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ४० लाखांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यताही दिली आहे. येथे आता झाडांसाठी खड्डे खणण्याचे काम वेगात सुरू आहे. पहिला पाऊस पडला ही १५ हजार रोपांची लागवड १५ ते ३० जून या दरम्यान करण्यात येणार आहे.
या रोपवनाच्या क्षेत्रात कडुनिंब, चिंच, आवळा, जांभूळ, मोहा, वड, पिंपळ ही झाडे लावली जाणार आहे. रोपवनाच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण प्रस्तावित करण्यात आले आहे. हे काम दोन महिन्यात पुर्ण केले जाईल. रोपवनासाठी नियोजन समितीमार्फत ४० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रोपवनाला उन्हाळ्यात पाणी देण्याची तरतुद करण्यात आली आहे.
अशी सुचली कल्पना
प्रतापराव पाटील हे सायकलिस्ट ग्रुपचे प्रमुख आहेत. ते अनेकदा मित्रांसोबत वावडद्या पर्यंत सायकलिंग करतात. त्याचदरम्यान सुनिल चौधरी यांना वनरक्षक संभाजी पाटील यांनी वडाचे झाड भेट दिले होते. हे झाड चौधरी यांनी आपल्या घरी न लावता रामदेव टेकडीच्या परिसरात लावले आणि त्याला नियमीत पाणी दिले. त्याची काळजी घेतली. हे पाहून प्रतापराव पाटील यांनी या जागेत वृक्षारोपण करण्याची कल्पना सुचली. त्यांनी या जागेची माहिती घेतली ही जागा वनविभागाची असल्याचे कळल्यावर त्यांनी प्रस्तावासाठी वनविभागाचे विवेक होशिंगे यांच्याकडे पाठपुरावा केला. मार्च २०२१ ला त्यासाठी ४० लाखांच्या खर्चाच्या निधीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सहकार्याने प्रशासकीय मंजुरी दिली.
कोट -
वनविभाग, जळगाव सायकलिस्ट क्लब आणि रामदेववाडीचे स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हा रामदेव टेकडीचा परिसर जळगावच्या लांडोरखोरी वन उद्यान याप्रमाणेच विकसित करण्याचा मानस आहे. आता लवकरच तेथे वृक्षारोपण देखील केले जाईल.
- प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी,जळगाव.