जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कल्याण येथील मायक्रोनेट एंटरप्रायजेस कंपनीशी ४४.९२ कोटी रुपयांचा करार केल्याची आशिष चौधरी (रा. उल्हासनगर) या व्यक्तीने दिलेली माहिती आणि कागदपत्रांवर असलेला विद्यापीठाचा शिक्का तसेच तत्कालीन कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांची स्वाक्षरी बनावट असल्याची बाब प्रभारी कुलसचिवांनी उल्हासनगर पोलिसांकडे स्पष्ट केली आहे.
उल्हासनगर येथील आशिष चौधरी या व्यक्तीने कल्याण पूर्व येथील आमदार गणपत यांच्याविरुद्ध खंडणीची व धमकी दिल्याबाबत उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात विद्यापीठाचाही उल्लेख आहे. त्या तक्रारीनुसार चौकशीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आशिष चौधरी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला गुगल रोबोट पुरविण्याचे आणि त्याआधारे विद्यापीठात रोबोट प्रशिक्षण सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. नंतर चौधरी यांची पंधरा ते सोळा व्याख्याने झाल्यानंतर दोन गुगल रोबोट विद्यापीठात देण्यात आले. नंतर ईआरपी सॉफ्टवेअरला मान्यता देऊन तसे पत्र कायक्रोनेट एंटरप्रायजेस कंपनीला देण्यात आले. करारानुसार कंपनीला ४४.९२ कोटी रुपये मिळणार होते. परंतु, विद्यापीठाने ही रक्कम दिली नाही व तत्कालीन कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचा दावा चौधरी यांनी चौकशीदरम्यान केला होता. त्यामुळे उल्हासनगर सहायक आयुक्तांनी विद्यापीठाला प्रभारी कुलसचिवांना पत्र पाठवून संपूर्ण वस्तुस्थिती काय आहे, याची विचारणा केली होती.
पाचजणांचे पथक विद्यापीठात
दरम्यान, आशिष चौधरी याने चौकशीत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पाचजणांचे उल्हास नगर पोलिसांचे पथक मंगळवारी विद्यापीठात दाखल झाले होते. यावेळी कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्यावर तत्कालीन कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांची स्वाक्षरी, विद्यापीठाचे शिक्का तसेच ई-मेल सुद्धा बनावट असल्याचे प्रभारी कुलसचिवांनी स्पष्ट केले. विद्यापीठाकडून दोन वेळेस अधिकृत पत्रव्यवहार झाले असल्याचे कुलसचिवांनी पोलिसांना सांगितले, तर आवश्यक रेकॉर्डसुद्धा पोलिसांना दिले. त्यानंतर कुलसचिवांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. पोलिसांच्या पथकाने तत्कालीन कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचीदेखील भेट घेतली आणि त्यांचेही जबाब नोंदवून घेतले.
विद्यापीठ तक्रार देणार का?
कागदपत्रांच्या पडताळणीत कुलगुरूंची स्वाक्षरी, शिक्के तसेच विद्यापीठाचे ई-मेल बनावट असल्याचे समोर आल्यानंतर विद्यापीठ याबाबत तक्रार करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तत्कालीन कुलगुरू यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा या कागदपत्रांवर वापर करण्यात आला आहे हे देखील पोलिसांना कुलसचिवांनी स्पष्ट केले आहे.