लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोना काळातील शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करावी, अशी मागणी जळगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,‘ संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण देणे सुरू आहे. मात्र काही संस्थाचालक व त्यांचे प्राचार्य विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. म्हणून त्यांना शाळेच्या ऑनलाइन ग्रुपमधून काढून टाकत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात आले आहेत. पालकांचे उद्योग धंदेच बंद असल्याने पालक फी कशी भरणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याचा गंभीरतेने विचार करून या वर्षात विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.