जळगाव : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पी.पी. माहुलीकर यांनी केलेल्या संशोधन चाैर्याच्या प्रकरणात तत्काळ चौकशीसाठी पॅनल गठित करावे, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी सोमवारी कुलगुरू पी.पी. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात या संघटनांनी डॉ. माहुलीकरांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली होती. याची दखल न घेतल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत.
प्र-कुलगुरू संशोधन गुगल वेबसाटवर सर्च केले असता ते रिट्रेक्ट म्हणून दिसत आहे. यामुळे विद्यापीठ संशोधन विभागप्रमुखाच्या संशोधन चौर्यासंदर्भात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणामुळे जागतिक स्तरावर विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. यामुळे विद्यापीठामध्ये होत असलेल्या संशोधनावरही संशय व्यक्त होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच जनसंवाद पत्रकारिता विभागातील प्रा. सुधीर भटकर यांच्याही प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा व विद्यार्थिनीस न्याय मिळवून द्यावा, तसेच परीक्षा विभागातील विनानिविदा एकाच पुरवठादारास दिलेली विविध कामांची देयके यासंबंधीही चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, माजी सदस्य अतुल कदमबांडे, राष्ट्रवादी काँग्रेस संघटना सचिव अॅड. कुणाल पवार, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, रोहन सोनवणे, युवा सेनेचे शिवराज पाटील, भूषण भदाणे, राहुल पोतदार यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.