जळगाव : भाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांनी २६ मार्च रोजी पारोळा येथे घेतलेल्या मेळाव्यात पक्षाचे माजी आमदार बी.एस. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद बुधवारी अमळनेर येथील मेळाव्यात उमटले असून याबाबतची क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
भाजपाने २२ मार्च रोजी मध्यरात्री जळगाव लोकसभा मतदार संघासाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून पक्षाचे खासदार ए.टी. पाटील हे नाराज झाले होते. यावर त्यांनी पारोळा येथे २६ मार्च रोजी समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यास उदय वाघ यांचे पक्षातीलच राजकीय शत्रू माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांनी उपस्थित राहून उदय वाघ व स्मिता वाघ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले असा उदय वाघ यांचा आरोप आहे. या विधानाचे पडसाद बुधवारी १० रोजी अमळनेर येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात उमटले. व्यासपीठावर बसलेल्या डॉ. बी.एस. पाटील यांना उदय वाघ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडविले.
डॉ. बी.एस. पाटील हे पारोळ्याच्या मेळाव्यात नेमके काय बोलले? याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता असतानाच त्याचीही क्लिप आता सोशल मीडियावर फिरते आहे. काय म्हणाले.. डॉ. बी.एस. पाटील हे यात स्पष्ट होते आहे.