लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाईची मोहीम सुरू असून, बुधवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार कारवाई करण्यात आली. अजिंठा चौकातील दुसऱ्या बाजूच्या रस्त्याकडून बुधवारी कारवाईस सुरुवात करण्यात आली. माजी महापौरांच्या भावाच्या मालकीच्या असलेल्या हॉटेलचे अतिक्रमणही रस्त्यालगत पोहोचले होते. महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सुरुवातीलाच याच अतिक्रमणावर कारवाई करीत दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. यासह महामार्गालगत असलेल्या गॅरेजचालकांवरही महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी काहीकाळ तणाव व वादही झाला.
मंगळवारी अजिंठा चौकाकडून लढ्ढा फार्मच्या बाजूच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. बुधवारी पलीकडच्या भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे अनेक विक्रेत्यांना मंगळवारीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही अनेक मुजोर विक्रेते व गॅरेज चालकांनी महापालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत दुकाने थाटली होती. महापालिकेचे पथक पोहोचल्यानंतर सर्व विक्रेते व गॅरेज चालक एकत्र जमा झाले. त्यांनी कारवाईला विरोध केला. अनेक बड्यांच्या अतिक्रमणाकडे महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोपही केला. मात्र, महापालिकेच्या आयुक्तांनी सुरुवातीलाच माजी महापौरांच्या भावाच्या मालकीची असलेल्या हॉटेल प्रीतमच्या अतिक्रमणावरच जेसीबी चालविण्याचा सूचना दिल्या. महामार्गालगत हॉटेलचे कंपाऊंड आले होते. सर्व पक्के बांधकाम महापालिकेच्या पथकाकडून तोडण्यात आले.
कारवाईला विरोध म्हणून जेसीबीसमोर आले गॅरेज चालक
महापालिकेच्या पथकाकडून कारवाईला सुरुवात झाल्यानंतर अनेक टपऱ्या जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्या. एक गॅरेज चालक कारवाईचा विरोध करीत थेट जेसीबीसमोर येऊन उभा राहिला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बाहेर काढले. मात्र, तरीही थेट टपरीवर बसून त्याने कारवाईस विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला उचलल्यानंतर महापालिकेच्या पथकाने टपऱ्या तोडण्यास सुरुवात केली.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत
काही गॅरेज चालक व काही भंगार व्यावसायिकांनी साहित्य दुकानाबाहेर काढण्यास नकार दिला. मात्र, महापालिकेकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आल्याने विक्रेत्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यामुळे काही काळ या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
गटारीवर बांधलेले दुकानेही तोडली
अनेकांनी आपल्या दुकानांचे बांधकाम अनधिकृत पद्धतीने केले होते. तसेच हे बांधकाम थेट महामार्गालगत येत होते. दुकानदारांनी महापालिकेच्या पथकाला कारवाईस मज्जाव केला. त्यानंतर ‘नही’च्या कर्मचाऱ्यांना बोलावून, रस्त्याची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये विक्रेत्यांनी मोठे अतिक्रमण केल्याचे आढळून आले. महापालिकेच्या पथकाने या विक्रेत्यांचा विरोध झुगारून कारवाई सुरूच ठेवली. तसेच काही विक्रेत्यांनी महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनाही धमकी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपायुक्तांनी धमकी देणाऱ्यांच्याच अतिक्रमणावर सर्वांत आधी कारवाई केली. महापालिकेच्या पथकाला सहकार्य करण्याचे आवाहनही महापालिकेच्या उपायुक्तांनी केले. मात्र, विक्रेते ऐकून घेण्याचा तयारीत नसल्याने महापालिकेकडून सरसकट कारवाई करण्यात आली.
दोन दिवसांत २५० अतिक्रमणांवर कारवाई
महापालिकेच्या पथकाकडून दोन दिवसांत महामार्गालगतच्या २५० अतिक्रमणांवर कारवाई केली असून, यामध्ये पक्क्या बांधकामाचाही समावेश आहे; तर जेसीबीच्या साहाय्याने १०० हून अधिक टपऱ्या तोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, खोटेनगरपर्यंतचे सर्व अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचीही माहिती उपायुक्तांनी दिली.