मुक्ताईनगर : बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आहे गुरुवारी दुपारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यासाठी हेलिकॅप्टरद्वारे सहकुटुंब रवाना झाले.दुपारी तीन वाजेच्या सुमारास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे तसेच पत्नी तथा महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे हे हेलिकॅप्टरद्वारे मुक्ताई शुगर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या साखर कारखान्यावरील प्रांगणात असलेल्या हेलिपॅडवरून रवाना झाले.सकाळी खडसे फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली होती. जवळपास एक हजार कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुरुवारी देखील घोषणाबाजी केली. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास माजी मंत्री खडसे हे हेलिपॅडकडे रवाना झाले व तीन वाजता मुंबईकडे रवाना झाले.दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबईकडे चारचाकी वाहनाने व रेल्वेने रवाना झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील ,माजी तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर,माजी सभापती विलास धायडे,राजेंद्र माळी, जिल्हा परिषद सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, वैशाली तायडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस संदीपराव देशमुख, खडसे यांचे स्वीय सहायक योगेश कोलते, पंचायत समिती सभापती विद्या पाटील यांचे पती विनोद पाटील, सुभाष टोके, सुभाष पाटील धर्मेंद्र चोपडे,पंचायत समिती सर्व सदस्य, बाजार समितीचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटी तसेच इतर सहकार क्षेत्रातील बहुतांशी भाजपाचे पदाधिकारी असे जवळपास पाचशे कार्यकर्ते हे मुंबईला रवाना झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे हेलिकॅप्टरद्वारा रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 8:25 PM