जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, शनिवारी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन हे शहरातील संपर्क कार्यालयात आले असता, इच्छुकांसह नगरसेवकांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली.
महापौर भारती सोनवणे यांचा कार्यकाळ १८ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर पदासाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरु केला आहे. सद्यस्थितीला महापौर पदासाठी भाजपाकडून प्रतिभा कापसे व ज्योती चव्हाण यांचे नाव आघाडीवर असून उज्ज्वला बेंडाळे यांचेही नाव चर्चेला आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन हे जळगावातील संपर्क कार्यालयात आले. ही माहिती मिळाल्यानंतर इच्छुकांसह नगरसेवकांनी संपर्क कार्यालयात धाव घेतली होती. यावेळी प्रत्येकाने त्यांची भेट घेवून चर्चा केली. याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, आबा कापसे, सुरेश पाटील, सचिन पाटील, प्रवीण जाधव, कुलभूषण पाटील, ज्योती चव्हाण, अतुल बारी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.