ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12- जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे माजी आमदार आर. ओ. पाटील यांना उमेदवारी देण्याचे सुतोवाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या भेटी दरम्यान केले. संजय राऊत हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून जळगाव जिल्ह्यात आले असताना शुक्रवारी, 12 रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान त्यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. सुरेशदादा यांनी राऊत यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. दरम्यान वरिष्ठ नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंदद्वार चर्चा झाली.आम्हालाही सुरेशदादांचा आर्शीवाद हवायावेळी महापौर ललित कोल्हे यांचा परिचय सुरेशदादांनी करुन दिला असता राऊत यांनी कोल्हे यांचा यंगमॅन म्हणून उल्लेख केला. याचबरोबर कमी वयात मोठे पद मिळाल्याबद्दल कौतुकही केले. यावर कोल्हे यांनी ‘हे’ दादांच्या आशिर्वादानेच शक्य झाले, असे विनम्रपणे सांगितले. यावर राऊत यांनी ‘ आम्हालाही दादांचा आशिर्वाद हवा आहे’ असा उल्लेख करत पुढील महापौर शिवसेनेचा होवू द्या असे सांगितले. सुरेशदादा जैन यांनी संगितले की पक्षासाठी जोरदार काम सुरु आहे. कोल्हे आपल्यासोबतच आहेत. महानगरप्रमुख शरद तायडे हे चांगले काम करीत आहेत. आर. ओ. पाटील हे लोकसभेसाठी राहतीलच. आमचे नियोजन सुरु आहे, अशी माहितीही सुरेशदादांनी राऊत यांना दिली. यावेळी जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर. ओ. पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान याभेटीच्या आधी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी राऊत यांनी भेट दिली. तेथून ते शिवसेना कार्यालयात आले. या ठिकाणी बैठक व्यवस्था व इतर सुविधा चांगल्या करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या.