माजी खासदार डॉ.उल्हास पाटील कॉग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबित
By सुनील पाटील | Published: January 22, 2024 04:18 PM2024-01-22T16:18:47+5:302024-01-22T16:19:14+5:30
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संघटन व प्रशासनाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे कारवाईचे पत्र तिघांना पाठविण्यात आले आहे.
जळगाव : प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील व युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे या तिघांना सहा वर्षासाठी कॉग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संघटन व प्रशासनाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे कारवाईचे पत्र तिघांना पाठविण्यात आले आहे.
डॉ.उल्हास पाटील यांची मुलगी डॉ.केतकी पाटील भाजपच्या संपर्कात असून भाजपकडे वाढता कल तसेच गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या घडामोडी लक्षात घेता केंद्रीय कार्यकारिणीकडे प्रदेश कार्यालयाकडून अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार २२ जानेवारी रोजी तिघांना निलंबित करण्यात आले. डॉ.केतकी पाटील या लोकसभेत भाजपच्या उमेदवार असतील असे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी वारंवार जाहिर केले. त्यासंदर्भात वृत्तपत्रांमधूनही बातम्या प्रकाशित झाल्या. त्याशिवाय भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांची दिल्लीत भेटही घेतली होती. याची पक्षाने गंभीर दखल घेत विस्तृत अहवाल श्रेष्ठींकडे पाठविला होता. गेल्याच आठवड्यात पक्षाची जाहिर झालेली जिल्हा कार्यकारिणीही स्थगित करण्यात आली होती. डॉ.केतकी पाटील यांच्यासोबत कॉग्रेसचा मोठा गट भाजपात जाणार असल्याच्या शक्यतेने ही कार्यकारिणी स्थगित केल्याचे बोलले जात आहे.