चाळीसगाव, जि. जळगाव : गेल्या महिन्याभरापासून अधून-मधून दर्शन देणारा पिंपरखेड शिवारातील बिबट्या गुरुवारी वनविभागाने लावलेल्या पिंजºयात अडकल्याचे आढळून आले. चाळीसगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार यांनी पथकासह धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.चाळीसगाव शहराच्या दक्षिणेला पाटणादेवी जंगलाच्या लगत १० कि.मी. अंतरावरील पिंपरखेड शिवारात ज्ञानेश्वर मुलमुले यांच्या शेतात बिबट्या गेल्या महिन्याभरात दोन ते तीन वेळा दिसला. यानंतर वनविभागाने मुलमुले यांच्या शेतात ट्रॅप कॅमेरा लावला. कॅमे-यात बिबट्याची छबी कैद झाल्याने काही दिवसांपूर्वी येथे पिंजरा लावण्यात आला.गुरुवारी पहाटे हा बिबट्या पिंज-यात कैद झाल्याचे आढळून आले. बिबट्या अडकल्याची वार्ता पसरल्याने नागरिकांनी येथे गर्दी केली. त्यामुळे वनविभागाच्या पथकाला कार्यवाही करताना अडथळा आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती धनंजय पवार यांनी दिली.
चाळीसगावला बिबट्या पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:41 PM