लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रुग्णांच्या अतिजोखमीच्या संपर्कात नसलेले मात्र, कोरोना बाधित असलेल्या विविध भागातील ५४ रुग्णांना त्या त्या भागात जाऊन तपासणी करून महापालिकेच्या पथकाने शोधून काढले आहे. या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्या परिसरातील पुढील मोठ्या संसर्गाचा धोका यामुळे टळणार आहे.
महापालिकेच्या कोरोना तपासणी टीमकडून गेल्या ३१ मार्चपासून ही हॉटस्पॉट टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. ज्या भागात सातत्याने अधिक रुग्ण समोर येत आहेत. त्या भागात जाऊन अधिकाधिक नागरिकांची या मोहिमेत तपासणी केली जात आहे.
धोका टाळण्यास उपयुक्त
या तपासणीत असे रुग्ण समोर आले आहेत ते कदाचित शासकीय केंद्रांवर तपासणीला गेले नसते, कारण हे रुग्ण अतिजोखमीच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या परिसरात जाऊन तपासणी करून रुग्णांचे निदान केले आहे. त्यामुळे तातडीने हे रुग्ण विलग झाले व त्यांच्यापासून होणारा पुढील संसर्ग टाळता आला आहे. यात लक्षणे असलेले व लक्षणे नसलेल्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे विशिष्ट गल्लीचे किंवा भागाचे या मोहिमेत पूर्णत: स्क्रिनिंग होत आहे. या रुग्णांना तातडीने या ठिकाणी तपासणी रिपोर्ट देऊन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते, सातत्याने ज्या भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागात ही टेस्टिंग केली जात असून नागरिकांनी तातडीने तपासणी करून, प्रशासनास सहकार्य कारावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.
या भागात तपासणी आणि आढळले रुग्ण
शिवाजीनगर, राधाकृष्णनगर, खोटेनगर, मुक्ताईनगर, शिवकॉलनी, जुने जळगाव, केशवबाग, ज्ञानदेवनगर गाडगेबाबा चौक यासह विविध २५ ठिकाणी हे कॅम्प घेण्यात आले. यात खोटेनगरात एकाच दिवसात ७ रुग्ण या मोहिमेत समोर आले होते.