जामनेर शहरातील आनंदयात्री परिवाराने शहरात सांस्कृतिक उपक्रमांची सुरुवात केली. पाडवा पहाट या संगीतमय कार्यक्रमाने कामाची सुरुवात केली. प्रेक्षक सभासद योजना राबवून सातत्यपूर्ण उपक्रम करावेत, असा मानस आहे. परिवर्तन, जळगाव या संस्थेने अल्पावधीत राज्यभर आपल्या कामाने आपली ओळख निर्माण केली आहे. नाटक, संगीतमय कार्यक्रम, साहित्यिक उपक्रम, चित्रकला अशा विविध माध्यमातून परिवर्तनचे अनेक महोत्सव जळगाव शहर व इतरत्र होतात. परिवर्तनला आपले आदर्श मानणारे आणि परिवर्तनच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गाक्रमण करायचं हे आनंदयात्रीचं ध्येय आहे. मग आनंदयात्रीने परिवर्तनला मदतीची हाक दिली. आनंदयात्रीच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद परिवर्तनकडून मिळाला. दर्जेदार व महाराष्ट्रभर गाजलेले कार्यक्रम जामनेरला करण्याचे ठरले.पहिल्या दिवशी अमृताची गोडी हा ८०० वर्षांच्या मराठी भाषेचा कवितेच्या माध्यमातून केलेला संगीतमय प्रवास या कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात झाली.मराठी भाषेची सुरुवात, मराठी भाषेच्या आठशे वर्षांच्या प्रवासात संत, पंत व तंत आधुनिक कविता, लोकपरंपरा यांनी हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर गेला. मराठी भाषा, तिचे प्रवाह, तिचा प्रवास, बोलीभाषा यामुळे कार्यक्रम मनोरंजक होताच. पण त्याहून अधिक भाषेच्या स्तरावर प्रत्येक रसिकाला समृद्ध करणारा अनुभव या कार्यक्रमाने दिला. सव्वादोन तास सलग रसिक मंत्रमुग्ध होऊन हा कार्यक्रम ऐकत होते. शंभू पाटील नावाच्या माणसाचा अभ्यास, विश्लेषण करण्याची पद्धती आणि प्रेक्षकांशी संवाद करण्याची दुर्मिळ कला यामुळे शंभूअण्णा बोलत असताना ते जणू प्रत्येकाच्या हृदयाशी संवाद करत आहेत, असा अनुभव प्रत्येक रसिकाला आला. त्याचं मन आनंदाने भरुन गेलं होतं. दिग्दर्शिका म्हणून मंजुषा भिडे यांनी हर्षल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाला अत्यंत आखीव, रेखीव पण अतिशय बांधीव असं स्वरूप दिलेलं आहे. यातील सर्वच वादक, गायक हे तसे नवखे व अपरिचित होते. पण त्यांचं सादरीकरण व्यावसायिक तर होतच, पण त्याहून अधिक त्यामध्ये प्रामाणिकपणा होता. यामुळेच हा कार्यक्रम मनाला भिडला. जामनेरच्या श्रद्धा पुराणिक-कुलकर्णी या गायिकेच्या गायकीने सर्व जामनेरकरांना अचंबित केले. एवढी मोठी गायिका आपल्या गावात आहे याचा अभिमान पण प्रत्येक जामनेर कर्माच्या मनात निर्माण झाला.दुसऱ्या दिवशी नली श्रीकांत देशमुख लिखित नलिनी देवराव या व्यक्तीरेखेचा शंभू पाटील यांनी केलेला अप्रतिम नाट्याविष्कार बघायला मिळाला. दिग्दर्शक योगेश पाटील यांनी कल्पकतेने हा प्रयोग बसवला आहे. हर्षल पाटील या कलावंतांने हा नाट्यप्रयोग आपल्या अभिनय सामर्थ्याने तोलून धरला आहे.तिसºया दिवशी अपूर्णांक या नाटकाने या महोत्सवाचा कळस गाठला. मोहन राकेश लिखित पन्नास वर्षांपूर्वीचे हे नाटक आजही प्रेक्षकांना समकालीन वाटतं. दिल्लीसारख्या महानगरांसाठी लिहिलेलं नाटक जामनेरमधल्या प्रेक्षकांना आपलं वाटतं याच श्रेय रूपांतरकार शंभू पाटील यांनादेखील आहे. दिग्दर्शक नारायण बाविस्कर यांनी नाटकाची गती, नाटकाचा परिणाम परिणामकारकपणे साधला आहे. होरिलसिंग राजपूत यांची प्रकाशयोजना, मिलिंद जंगम यांचं पार्श्वसंगीत, मंगेश कुलकर्णी यांचं सूचक नेपथ्य यामुळे सुरेख वातावरण निर्मिती झाली. प्रतीक्षा कल्पराज, मोना निंबाळकर , राहुल निंबाळकर या कलावंतांनी अत्यंत तन्मयतेने हा प्रयोग सादर केला. त्यामुळे हे नाटक न वाटता समोर घडतंय ते वास्तव आहे, असा आभास निर्माण झाला. मंजुषा भिडे यांच्यामधल्या समर्थ अभिनेत्रीचं दर्शन या नाटकामुळे झालं. शंभू पाटील या कलावंतांने पाच भूमिका सादर करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. हसवले, रडवले, विचारात पाडले. अंतर्मुख करत प्रत्येक रसिकाच्या मनात आपले स्थान निर्माण केले.तिसºया दिवशी भरगच्च भरलेल्या सभागृहाने हे नाटक डोक्यावर घेतले. एका मंगल कार्यालयाचं रूपांतर नाट्यगृहात होताना मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. हेच परिवर्तन टीमचं यश आहे. आलेला प्रत्येक रसिक भारावला होता.प्रत्येकाच्या तोंडून एक विषय सतत ऐकायला मिळाला तो म्हणजे तीनही दिवस आम्ही जे अनुभवलं ते अत्यंत उच्च कोटीतील होतं. तुम्ही सांगता म्हणून हे कार्यक्रम जळगावच्या आहेत अन्यथा पुण्या-मुंबईच्या व्यावसायिक लोकांपेक्षाही सुंदर कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाले. याबद्दल सर्व रसिक आनंदयात्रीला धन्यवाद देत होते. आनंद यात्री परिवाराने केलेला हा प्रयत्न आणि त्याला मिळालेली रसिकांची दाद व पसंतीची पावती यामुळेच जामनेरमध्ये एका नव्या पर्वाच्या परिवर्तनाची नांदी या महोत्सवाने केली आहे हेच खरं.-विशाल सुधाकर कुलकर्णी, जामनेर
सांस्कृतिक पर्वाची पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 4:14 PM