लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात संपूर्ण शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यामुळे अनेकांना पद्धतशीर शिक्षण मिळू शकले नाही तर, काहींना ऑनलाइनची सुविधा नसल्याने शिक्षण घेता आले नाही. या तक्रारी विचारात घेऊन १ जुलैपासून सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहेत. विद्यार्थ्यांचा मागील इयत्तेचा पाया पक्का व्हावा हा यामागील मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची उजळणी होणार असली तरी अभ्यासक्रमात पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वयंअध्ययनाला चालना मिळणार
सेतू अभ्यासक्रमात बऱ्याच चांगल्या आणि नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनाला चालना मिळणार आहे. वैचारिक पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यामध्ये कल्पक होऊ या, सक्षम बनू या, जाणून घेऊ या, थोडे आठवू या, करून पाहू या, चला सराव करू या, समजून घेऊ या, संबोध कोपरा, मदत कोपरा, आव्हानात्मक कोपरा यासारख्या नावीन्यपूर्ण बाबींचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करण्यास वाव मिळणार आहे. याशिवाय संदर्भासाठी काही उपयुक्त वेबलिंक्स देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांना मिळाले नाही प्रशिक्षण
१ जुलैपासून सेतू अभ्यासक्रम सुरू झाला असला तरी याची अंमलबजावणी कशी करावी याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले नाही. परिणामी शिक्षक संभ्रमात आहेत. सेतू अभ्यासक्रमाची पुस्तिका उपलब्ध नसल्याने बरेच शिक्षक स्वत: खर्च करून पुस्तिका झेरॉक्स करत आहेत. नेमकं विद्यार्थ्यांना काय पुरवावे? त्यांच्याकडून कोणता अभ्यास करून घ्यावा? अभिलेख कोणते आणि कसे ठेवावेत? याबाबत कोणते मार्गदर्शन शिक्षकांना मिळाले नाही.
सेतू अभ्यासक्रम ही संकल्पना चांगली असली तरी ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी, परिस्थिती यांचा विचार न करता तयार केल्याने त्यास कितपत यश यावर त्याची उपयुक्तता सिद्ध होईल.
- डॉ. विजय बागुल, अध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघ
अशा आहेत समस्या
- ग्रामीण भागात अनेक पालकांकडे स्मार्टफोन नाही़ त्यामुळे सर्व मुलांपर्यंत हा अभ्यासक्रम कसा पोहोचवावा.
- ज्या मुलांकडे स्मार्टफोन नाही. त्यांना शाळेत बोलवून शिक्षण देणे शक्य नाही. शाळा बंद असल्याने ही मुले सेतू अभ्यासक्रमापासून वंचित राहतील.
- सेतू अभ्यासक्रम ४५ दिवसांचा आहे. मात्र या कालावधीत ८ ते ९ दिवस सुटी आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत हा अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा असा प्रश्न आहे.
- ग्रामीण भागातील पालक सकाळी ८ वाजता कामावर गेल्यावर रात्री ८ वाजता परत येतात. त्यामुळे रात्री मुलांची अभ्यास करण्याची मानसिकता राहत नाही.
- एका घरात एकच फोन मात्र दोन तीन मुले असतील तर एकाचवेळी कसा अभ्यास करतील.
- सेतू अभ्यासक्रम पुस्तिका उपलब्ध नसल्याने एका वर्गाची एका विषयाची झेरॉक्स करण्यासाठी ५० ते ६० रुपये खर्च येतो. त्यामुळे वर्गासाठी एक ते दीड हजार रुपये खर्च येणार आहे. एवढा खर्च कोठून करावा.
- ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पैशांअभावी मोबाइल डाटा उपलब्ध नसणे अशा समस्या आहेत.
- सेतू अभ्यासक्रमातील बऱ्याचशा कृती शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समोरासमोर घडणाऱ्या आहेत. मात्र शिक्षकच समोर नसेल तर विद्यार्थी कृती कशा करतील.