लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शहर पोलिसांच्या टीमने चाळीसगावच्या एक व नाशिकच्या दोन अशा तीन चोरट्यांकडून चार मोटारसायकली ताब्यात घेऊन त्या तिघांना अटक केली आहे. आणखी चोरीस गेलेली वाहने या चोरट्यांकडून मिळण्याची शक्यता बळावली आहे.
२८ रोजी चोरीस गेलेल्या मोटारसायकलींच्या गुन्ह्यात सहायक फौजदार अनिल अहिरे हे तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून, शहरातील हिरापूर बायपासजवळ सापळा रचून धनराज गजानन रुमकर (१९, चाळीसगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शहर हद्दीतील चोरीस गेलेली मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. मात्र, ही मोटारसायकल त्याच्या दोघा साथीदारांनी नाशिक येथे लपवून ठेवली असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी नाशिक येथे सापळा रचून त्याचे साथीदार यश सुधाकर इंदोरकर (२०) व यश नंदू कांबळे (१९, दोघे सामनगाव रोड, नाशिक) या दोघांना या गुन्ह्यात अटक केली.
चौकशीत या दोघांनी आणखी तीन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, सहायक फौजदार अनिल अहिरे, पोलीस नाईक शैलेंद्र पाटील, प्रवीण संगेले, पोलीस काॅन्स्टेबल निलेश पाटील, दीपक पाटील, विनोद खैरनार, विजय पाटील, भूषण पाटील, शरद पाटील, प्रवीण सपकाळे, अशोक मोरे, पवन पाटील, अमोल भोसले यांनी चाळीसगाव व नाशिक येथे आरोपींना सापळा रचून पकडले आहे.