लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराला वळसा घालून जाणारा आणि चौपदरीकरणात तयार होत असलेल्या
राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम ठेकेदाराने
वेळेत केले नाही. त्यामुळे या ठेकेदाराला तब्बल ४ कोटी रुपयांचा दंड
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठोठावला आहे.
तरसोद ते फागणे या टप्प्यासाठी २०१६ मध्ये निविदा निघाली होती. इंदूरच्या
एका ठेकेदाराने त्याचे काम घेतले. त्यावेळी त्याची किंमत ही २०० कोटी
रुपये होती. मात्र, हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या ठेकेदाराला
वारंवार नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर काही काळ ठेकेदाराने वेगाने काम
सुरू केले. मात्र, पुन्हा एकदा हे काम मंदावले आहे. आता या ठेकेदाराला
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चार कोटी रुपयांचा
दंड ठोठावला आहे.
जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी तरसोद ते फागणे या टप्प्यात काम
करणाऱ्या ठेकेदाराचा करार रद्द करून तातडीने नवी निविदा काढण्याची मागणी
केली आहे. या कामाला उशीर होत असल्याने या रस्त्यावर जवळपास दोनशेजणांचे
अपघात झाले आहेत. त्यातील ७५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यूदेखील झाला आहे.
खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभेत देखील या प्रश्नाला वाचा फोडली होती.
कोट - जिल्ह्यातून जाणाऱ्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ठेकेदाराला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर आम्ही पाहणी देखील केली. त्यात ठेकेदाराच्या कामात प्रगती दिसून आली आहे. - उन्मेश पाटील, खासदार
कोट - तरसोद ते फागणे या दरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने केल्याबद्दल ठेकेदाराला दंड करण्यात आला आहे. निश्चित रक्कम मात्र सांगता येणार नाही - सी. एम. सिन्हा, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण.