रावेर, जि.जळगाव : शहरातील सावदा रोडलगतच्या महाजन अॅक्सीडेंट हॉस्पिटलसमोरून चोरट्यांनी लांबवलेला सव्वाचार लाख रुपये किमतीचा ट्रक मध्य प्रदेशातील महू येथील किशनगंज पोलिसांच्या मदतीने रावेर पोलिसांनी जप्त केला असून, आंतरराज्यीय चोरट्यांच्या चांडाळ चौकडीला गजाआड केले आहे. उभय चोरट्यांना रावेर न्यायालयासमोर उभे केले असता दिवाणी न्यायाधीश आर.एल.राठोड यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस सूत्रांनुसार, शहरातील सावदा रोडलगतच्या महाजन अॅक्सीडेंट हॉस्पिटलसमोर शेख एजाझ शेख फैय्याज रा इमामवाडा (रावेर) यांनी उभा केलेला पांढरी कॅबीन व नॅशनल रंगाची बॉडी तथा सव्वा चार लाख रू किंमत असलेला ट्रक (एमएच-१९-सीवाय-२६०३) कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना दि.२७ आॅगस्ट रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदूर नजीकच्या महू शहरातील किशनगंज पोलिसांनी अबकारी अधिनियम ३४ (२), आर्म अॅक्ट २५ व २७ अन्वये दाखल गुन्ह्यात हा ट्रक जप्त करण्यात आला होता.त्या अनुषंगाने गुन्ह्याच्या तपासाची कडी उलगडताना हा जप्त ट्रक रावेरहून लांबवल्याची बाब उघड झाल्याने, रावेर पोलिसांशी संपर्क साधला. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सानप, पो कॉ सुरेश मेढे, पो कॉ तुषार मोरे यांनी मध्य प्रदेशातील किशनगंज पोलिसांशी संपर्क साधून हा ट्रक जप्त केला. या चोरीतील आरोपी सलीमशहा रमजानशहा (वय ५०, राजमहाल कॉलनी, माणिक ब्रीज इंदूर), अकील मोहंम्मद नबी मोहंम्मद (वय ३८, रा. गुलमोहर कॉलनी, हसद हैदरी रोड, धार, जि.धारणी), जितेंद्र कैलास धारेकर (वय ३४, रा.सोनिया गांधी नगर, इंदूर), नबाब आता मोहंम्मद मन्सरी (रा.लोखंडी गेट, गल्ली नं.५, चंदननगर, इंदूर) यांना पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी अटक केली आहे.या चौघाही आरोपींना मंगळवारी रावेर न्यायालयात हजर केले असता, दिवाणी व फौजदारी न्या.आर.एल.राठोड यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रावेरचा सव्वा चार लाख रुपये किमतीचा लांबवलेल्या ट्रकसह चार आंतरराज्यीय चोरटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 12:43 AM
चोरट्यांनी लांबवलेला ट्रक मध्य प्रदेशातील महू येथील किशनगंज पोलिसांच्या मदतीने रावेर पोलिसांनी जप्त केला आहे.
ठळक मुद्देन्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी रावेर पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा