जळगाव : डोंबिवली येथे मुलाच्या भेटीसाठी गेलेल्या संतोष झिपरु पाटील यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी चार लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये रोख असा पाच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी सकाळी मू,जे. कॉलेज परिसरातील विद्यानगरात उघडकीस आली. दरम्यान, पाटील यांच्या शेजारी त्यांच्या भावाचेही घर फोडण्याचा प्रयत्न केला,मात्र तो अयशस्वी ठरला.संतोष पाटील हे विद्यानगर प्लॉट क्रमांक २७ येथे पत्नी मंगला पाटील यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या बाजूलाच मोठे बंधू प्रल्हाद पाटील व मागे बंधू अशोक पाटील कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रस्त्याला लागून हे निवासस्थान आहे. संतोष पाटील यांची मुले चेतन व उज्ज्वल पाटील हे डोंबविली येथे वास्तव्यास आहेत. या मुलांना भेटण्यासाठी पाटील दाम्पत्य पंधरा दिवसापूर्वी घराच्या दरवाजाला कुलूप लावून गेले होते. रविवारी सकाळी बंधू अशोक पाटील हे बाहेर फिरण्यासाठी मागच्या घरातून पुढे आले असता त्यांना संतोष पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी भाचा सागर पांगळे यांना घटनास्थळी बोलवून घेत रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली.चांदीचे दागिने घरातच सोडलेचोरट्यांनी कपाटाचे कुलुप तोडून त्यातील १३ तोळे सोने, एक लाख रुपये रोख घेऊन पोबारा केला. यावेळी साहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटातील चांदीचे दागिने मात्र जागेवरच सोडून दिले आहेत. घरात लॉकरमध्ये १३ तोळे दागिने व एक लाख रुपये रोख होते अशी माहिती संतोष पाटील यांनी त्यांच्या भावाला दिली. दरम्यान, रामानंदनगरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी ललित भदाणे तसेच सुभाष सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संतोष पाटील गावावरुन परतल्यावर तक्रार देणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, संतोष पाटील यांचे बंधू प्रल्हाद पाटील हे देखील याच प्लॉटमध्ये बाजूला राहतात. त्यांचा मुलगा नाशिक येथे असल्याने ते त्याच्या भेटीसाठी गेले होते.त्यामुळे हे घर देखील बंद होते. तेथे चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र सेंट्रल लॉक न तुटल्याने चोरीचा प्रयत्न फसला.
चार लाखाचे दागिने व एक लाखाची रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:55 PM