लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अगदी झपाट्याने आघाडी घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात पहिला व दुसरा डोस असे एकत्रित ३ लाख ७८ हजारांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहेत. आगामी काळात दर दिवशी एक लाखांपेक्षा अधिक लसीकरण करण्यावर भर राहणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यात जिल्ह्यातील ६० टक्के जनता लसीकरणातून सुरक्षित झाल्याचे चित्र आहे.
लस घेतल्यावरही कोविडचे नियम पाळणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेक नागरिक लसींचे दोन डोस घेतल्यानंतर बिनधास्त विना मास्क वावरताना दिसत असून हे धोकादायक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. लस घेतल्यानंतर तुम्हाला कोविड होणारच नाही या गैरसमजातून तुम्ही धोका ओढवून घेऊ शकतात. तुम्हाला कोविड होण्याचा धोका असतोच मात्र, त्याचे गांभीर्य लसीकरणाने कमी होते. मात्र, तुमच्याकडून दुसऱ्यांना कोविड होऊन हायरिस्क व्यक्तिला यात जीवाचा धोका उद्भवू शकतो. असे तज्ञ सांगतात. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून घेणे व कोरोनाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे.
पुराचा जामनेर, अमळनेरात फटका
चाळीसगाव, जामनेर, अमळनेर या भागात अतिवृष्टी झाली याचा जामनेवर व अमळनेरातील लसीकरणावार परिणाम झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. गुरूवारी अमळनेर व जामनेरातील शहरातील लसीकरण केंद्र बंद होते तर ग्रामीण भागात कमी प्रमाणात लसीकरण झाले. अमळनेरात ७२५, जामनेर ग्रामीण भागात ३२९५ जणांनी लस घेतली. चाळीसगावात मात्र सर्वाधिक लसीकरण झाले आहे. चाळीसगावात ७४४५ जणांनी लस घेतली यात शहरी व ग्रामीण दोनही ठिकाणी लसीकरण झाले.
शहरातही वेग
जळगाव शहरातही लसींचा मुबलक पुरवठा झाल्याने दिवसाला ६ हजारापेक्षा अधिक लसीकरण होत आहे. त्यात गुरूवारी शहरात ६३६९ जणांनी लस घेतली.
असे झाले लसीकरण
१ सप्टेंबर : ७८३५२
२ सप्टेंबर : १४७९४
३ सप्टेंबर : २३८०
४ सप्टेंबर : १ लाख ९१३
५ सप्टेंबर ७९०७
६ सप्टेंबर २३९३
७ सप्टेंबर १३३५
८ सप्टेंबर ११८५४४
९ सप्टेंबर ५२२३९
दहा दिवसातील एकूण लसीकरण : ३७८८५७
पहिला डोस ३११५८६
दुसरा डोस ६७२७१
पात्र लाभार्थी २८ लाख
एकूण लसीकरण : १७ लाख १२७८५
दोनही डोस घेऊन अधिक सुरक्षित झालेले : ४२९७५०