जळगाव: जळगाव ते औरंगाबाद रस्त्याच्या रूंदी वाढीच्या कामाच्या उद्घाटनातच चौपदरीकरणाची घोषणा केल्यानंतर मागील महिन्यातच या चौपदरीकरणासही शासनाने मंजुरी दिली आहे. दरम्यान आधीच्या कामातही जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अजिंठा चौफुलीपासून सुमारे ६ किमीपर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्यास मंजुरी असल्याने या कामास लवकरच सुरूवात होणार आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, दि.४ रोजी याबाबत औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सूचना दिल्यानंतर यासंदर्भातील हालचालींना गती आली आहे.जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूकीचा असल्याने राष्टÑीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण केले होते. त्यात दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून येत-जात असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले. तसेच चौपदरीकरणास जास्त खर्च येत असल्याने या रस्त्याच्या दुहेरीकरणास म्हणजेच रूंदीवाढीच्या कामासही मंजुरी देण्यात आली होती. मधला डांबरी रस्त्याची रूंदी वाढवून ७ मीटर करणे व त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दीड-दीड मीटरची रूंदी वाढवून रस्ता १० मीटर रूंद करण्याचे प्रस्तावित होते. त्या कामास मंजुरीही मिळाली. मात्र रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजूरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. या कामाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सिल्लोड येथे दोन महिन्यांपूर्वी आले होते. त्यांनी या विषयाची माहिती घेऊन उपलब्ध जागेतूनच चौपदरीकरण करण्यात यावे असा आदेश केला होता. त्यानुसार ऋतविक इन्फ्रास्ट्रक्चर हैद्राबात या मक्तेदारास कामाबाबत आदेशही देण्यात आले
अंिजंठा चौफुलीपासून लवकरच चौपदरीकरणास प्रारंभजळगावातील अजिंठा चौफुलीपासून औरंगाबादपर्यंतच्या या रस्त्यापैकी पहिल्या निविदेनुसार अजिंठा चौफुलीपासून सुरूवातीला शहरातील ६ किमीचा रस्ता चौपदरीकरणास मंजुरी होती. तर त्यापुढील रस्त्याच्या दुहेरीकरणास मंजुरी होती. आता संपूर्ण रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार मक्तेदाराने नेरी येथे कार्यालय उभारण्यास सुरूवातही केली आहे. दरम्यान जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी अजिंठा चौफुलीवर सातत्याने अपघात होत असून निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण अजिंठा चौफुलीपासून तातडीने सुरू केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होईल, अशी मागणी केली होती. त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहमती दर्शविली होती. त्यानुसार डीपीडीसीची बैठक आटोपल्यावर पालकमंत्र्यांनी औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सूचना केली. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.