जळगाव : बुधवारी जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे चार नवीन रुग्ण आढळून आल्याची नोंद प्रशासनाकडे झाली. यात जळगाव शहरात एक तर भुसावळात तीन बाधित आढळून आले आहेत.
अजूनही कोरोनाचा संसर्ग कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ६९० कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४० हजार ९० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे, तर २ हजार ५७५ बाधितांचा कोरोना मृत्यू झाला. सद्यस्थितीत २५ बाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच २३९ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा रिकव्हर दर हा ९८.१८ टक्के तर मृत्यूदर १.८० टक्के आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील चार केंद्रांवर कोविशिल्डचे ३० तर, कोव्हॅक्सिनचे ४० डोस शिल्लक आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ९६३ नागरिकांनी लसीचा पहिला आणि २५९ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. गुरुवारी लस उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आतापर्यंत ८ लाख ९६ हजार ७५६ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, ३ लाख १५ हजार ७६९ नागरिकांनी दुसरा डोसदेखील पूर्ण केला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.