मनपाकडून १८ हॉकर्सवर कारवाई, १ दुकान सील : मनपा, पोलिसांच्या पथकांनीही दुकाने केली बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध सुरू केले आहेत. दुपारी ४ वाजल्यानंतर दुकाने बंद करण्याच्या आदेशानंतर सोमवारी दिवसभर गजबलेल्या जळगाव शहरात दुपारी ४ वाजेनंतर मात्र अभूतपूर्व शांतता पसरली होती. घड्ड्याळाचा काटा ४ वर पोहचल्यानंतर शहरातील सर्व मार्केटमधील दुकाने बंद झाली तर रस्त्यावरील हातगाड्या चालकही आपल्या गाड्या घेऊन घरी परतले. दरम्यान, सोमवारी मनपाकडून नियमांची पायमल्ली केल्यामुळे राजकमल टॉकीज परिसरात एक दुकान सील केले आहे.
दुपारी ४ वाजेनंतर मेडिकल वगळता इतर व्यावसायिक दुकाने व आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. सोमवारी वीकेंड लॉकडाऊननंतर सकाळी बाजारपेठा पुन्हा गजबजल्या होत्या. त्यातच दुकाने चार वाजेनंतर बंद केली जाणार असल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. फुले मार्केट, गोलाणी मार्केटमध्येदेखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. दुपारी ४ वाजेनंतर मात्र दुकानदारांनी स्वत:हून पुढाकार घेत मार्केट बंद केले.
मनपा कर्मचारी व पोलिसांनीही दुकाने केली बंद
शहरातील मुख्य मार्केटमधील दुकाने बंद झाल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यालगतची काही दुकाने मात्र ४ वाजेनंतरदेखील सुरू होती. त्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व पोलिसांच्या पथकांनी मुख्य बाजारपेठ परिसरात पाहणी करत, दुकाने बंद करण्याचा सूचना दिल्या. ४.३० वाजेनंतर मात्र मुख्य बाजारपेठ परिसरातील १०० टक्के दुकाने बंद झाली होती.
हॉकर्स मात्र ऐकण्याच्या स्थितीत नाहीत
दुपारी ४ वाजेनंतर मार्केट बंद करण्याचे आदेश असतानाही शहरातील अनेक हॉकर्स जिल्हा प्रशासनाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत आहेत. शहरातील ख्वॉजामिया चौक व मुख्य बाजारपेठ परिसरात अनेक हॉकर्सने दुकाने थाटली होती. मनपा कर्मचाऱ्यांनी सूचना देऊनही या ठिकाणी व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून १८ हॉकर्सवर कारवाई करून, त्यांचा माल जप्त करण्यात आला. तर राजकमल टॉकीज परिसरातील भैय्याजी कुल्फी हे दुकान देखील सील करण्यात आले. विशेष म्हणजे आतापर्यंत या दुकानावर पाचवेळा कारवाई करण्यात आल्याची माहिती मनपा कर्मचाऱ्यांनी दिली. दरम्यान, मंगळवारपासून मनपाकडून अजून तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.