आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३१ : बनावट नोटा प्रकरणात जळगावचा पोलीस रविकांत वसंत पाटील (मुळ रा.वरणगाव, ता.भुसावळ) व वशिष्ट पुंडलिक जाधव (रा. टाकळी टें, ता.माढा, जि.सोलापूर) या दोघांसोबत आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सिध्दू नाईकनवरे, प्रताप चंदनकर, दत्ता उपासे (तिन्ही रा.कोरुली, ता.पंढरपूर, जि.पुणे) व संजय रुपनवार (रा.साकारी, ता.इंदापूर जि.पुणे) अशी चौघांची नावे आहेत.
नोटा छापण्यापासून तर वितरीत करण्यापर्यंत या चौघांनी या प्रकरणात काम केलेले आहे. तर काही जण प्रिंटर, कागद व अन्य साहित्य आणून देण्याचे काम करीत असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.त्यामुळे या चौघांनाही मंगळवारी आरोपी करण्यात आले.
दरम्यान, पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने रविकांत व वशिष्ट या दोघांना मंगळवारी माढा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुन्हा ३१ जानेवारीपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. रविकांत याच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती सोलापुर पोलिसांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना पाठविली आहे.
या गुन्ह्यात आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना आरोपी करण्यात आले आहे. या चौघांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. त्यांच्या अटकेनंतर आणखी काही बाबींचा उलगडा होऊ शकतो.
-पी.के.म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक, टेंभूर्णी पोलीस स्टेशन