जळगाव आगार : दुसऱ्या दिवशीही ३० प्रवाशांची अँटीजन चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव मनपा आरोग्य विभागातर्फे नवीन बसस्थानकात सुरू करण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत मंगळवारी चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी दिवसभरात ३० प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात आली.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मनपातर्फे सोमवारपासून नवीन बसस्थानकात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. यासाठी मनपातर्फे बसस्थानकात स्वतंत्र आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाद्वारे स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी या ठिकाणी ७० जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली होती. यामध्ये एकही प्रवासी कोरोनाबाधित आढळून आला नव्हता. मात्र, मंगळवारी करण्यात आलेल्या ३० प्रवाशांच्या अँटिजन चाचणीत चार प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या बाधित प्रवाशांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे मनपा आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, स्थानकात दररोज होणाऱ्या चाचणीमुळे शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.