लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : येथे कोविडचे रुग्ण वाढत असून धरणगाव तालुक्यात मलेरिया, टाइफाइडसह सर्दी, खोकला यांचीही साथ सुरू आहे. असे अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचार करण्यासाठी येत असून त्या ठिकाणी सर्दी व खोकला संदर्भात औषध साठा शिल्लक नसल्याने औषधी रुग्णांना मिळत नाहीत. असे असताना आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला.
या ठिकाणी दहा ऑक्सिजन बेड असून रुग्ण संख्या ३० ते ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असताना चार रुग्णांचा मृत्यू झाला. याठिकाणी उपचार घेत असलेले रुग्ण एक खर्दे येथील तर तीन धरणगावातील रुग्ण आहेत यांचे वय ५५ ते ६५ वर्षे यादरम्यान आहे. धरणगाव तालुक्यात एकूण ८९ खेडे धरणगावला लागून आहेत. रुग्णाची गैरसोयदेखील या ठिकाणी होत असते.
जिल्हा सामान्य रुग्णालयापासून बत्तीस किलोमीटर असून धरणगाव तालुका उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याठिकाणी रूग्णालयात एक्स-रे मशीन, जनरेटर सोनोग्राफी सेंटर अशा विविध प्रकारे आवश्यक रूग्णालयाला लागणारे साधने नाहीत. तसेच अनेक पदे देखील रिक्त आहेत. लवकरात लवकर सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावेत व उपजिल्हा रुग्णालय व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होते.
रुग्णांना या ठिकाणी पिण्याचे पाणीदेखील मिळत नाह. धरणगाव रूग्णालयात रुग्णांचे प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रुग्ण याठिकाणी पाणी बाहेरून विकत पाणी आणून पित असतात.
येथे ग्रामीण रुग्णालयात १० बेड ऑक्सिजनचे असून ३० ते ३५ पेशंट उपचार घेत आहेत. ज्या रुग्णांना अत्यावश्यक आहे, त्या रुग्णांना आम्ही ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत आहोत. तरीही ऑक्सिजन बेड याठिकाणी कमी पडत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झालेला दिसून येतो. ज्यावेळेस रुग्णाची परिस्थिती जास्त होत आहे, त्यावेळेस रुग्ण रुग्णालयात दाखल होताना दिसून येतात. त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी उपचार घेणे आवश्यक आहे.
-गिरीश चौधरी, वैद्यकीय अधिकारी, धरणगाव
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घातले असते, याठिकाणी कर्मचाऱ्यांचा पुरवठा पूर्ण केला असता, सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या असत्या, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तरी जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्री यांनी लवकरात लवकर साेयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; अन्यथा धरणगाव तालुक्यातील जनता यांना माफ करणार नाही.
-कैलास माळी, नगरसेवक, भाजपा गटनेते धरणगाव
रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले असून लवकरच ऑक्सिजन बेडची संख्या वाढणार आहे. दुसरीकडे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरासह तालुक्यातील डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात शक्य असेल तेवढा वेळ सेवा देण्याचा प्रयत्न करावा. त्याबदल्यात मी व्यक्तिगत मोबदला देखील देण्यास तयार आहे.
-निलेश चौधरी, नगराध्यक्ष धरणगाव