लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाच बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील चार मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्याच्या सहा तासांच्या आत झालेले असल्याचे समोर आले आहे. मृत्यूची कारणे शोधण्यासाठी डेथ ऑडिट कमिटी स्थापन करण्यात आली असून, त्यानुसार ही कारणे समोर आली आहेत.
लवकर तपासणी करून लवकर उपचारास सुरुवात करावी, अन्यथा जीवावर बेतू शकते, असे आवाहन यंत्रणेकडून वारंवार केले जात असतानाही अनेक रुग्ण आजार अंगावर काढत असून, अगदी गंभीरावस्थेत रुग्णालयात दाखल होत असल्याचे समोर येत आहे. अशा स्थितीत उपचारासाठी डॉक्टरांकडे पुरेसा वेळ नसतो व रुग्ण दगावतो, अशी स्थिती होते, तसेच काहीसे चित्र समोर येत आहे. चार रुग्णांचा सहा तासांच्या आत मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यू परीक्षण समितीकडून याचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद रोज आढावा घेत आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणाहून उशिरा रुग्ण आला त्या ठिकाणी रुग्ण इतके दिवस कुठे होते, याची विचारणा करण्यात येत आहे. रुग्ण लवकर रुग्णालयात दाखल व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.