जळगाव : एकाच दुचाकीने नातेवाइकाच्या लग्नासाठी जळगाव येथे येणाऱ्या चौघांना ट्रॅक्टरने उडविल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:४० वाजता जळगाव तालुक्यातील किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर घडली. या गंभीर अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जखमी झाले. तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील फुफणी येथील रहिवासी ज्ञानेश्वर सपकाळे हे आपल्या दुचाकीने जळगाव शहरातील रिंगरोडवरील एका सभागृहात आयोजित नातेवाइकाकडील लग्नाला येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा डिगंबर सपकाळे (वय १२), त्यांचे मित्र राजेंद्र सोनवणे (वय ४२), नीलेश निकम (वय ३८) हे तीन जण सोबत होते. एकाच दुचाकीने फुफणी येथून निघाल्यानंतर किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर सावखेड्याकडून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात चारही जण दूर फेकले गेले. ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागल्याने त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर इतर तीन जण जखमी झाले. सावखेडा, किनोद ग्रामस्थांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. दरम्यान, सावखेडा गावाकडून येणारे ट्रॅक्टरमध्ये मका भरला असल्याची माहिती घटनास्थळी असलेल्यांनी दिली.
पत्नी लग्नाच्या ठिकाणी पतीच्या प्रतीक्षेतज्ञानेश्वर सपकाळे यांच्या जवळच्या नातेवाइकाकडे लग्न असल्याने, ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पत्नी वंदना सपकाळे या सकाळीच लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर पतीसोबत येणाऱ्या मुलाचीही त्या वाट पाहत होत्या. मात्र, लग्नाची वेळ झाल्यावर देखील पती व मुलगा आला नसल्याने वंदना सपकाळेंची धाकधूक वाढली. त्यानंतर काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लग्नाच्या ठिकाणी आनंदावर विरजण पडले. ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पश्चात तीन मुलं, पत्नी, आई असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.