जिजाबराव वाघ/ चाळीसगाव
चाळीसगाव (जि. जळगाव) : शेतात सालदारकी करणाऱ्या कु टुंबातील चार भावंडांचा शेताजवळच असलेल्या केटी वेअरमध्ये बुडून मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना पिंपरखेड ता. चाळीसगाव येथे रविवारी सायंकाळी घडली. मृतांमध्ये तीन बालिका व त्यांच्या भावाचा समावेश आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी भावा -बहिणीचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवांजली सुभानिया आर्य (६ वर्षे), रोशनी सुभानिया आर्य (९ वर्षे), आराध्या सुभानिया आर्य (४ वर्षे), आर्यन सुभानिया आर्य (५ वर्षे) अशी बुडून मरण पावलेल्या भावंडांची नावे आहेत. पिंपरखेड गावालगतच उदय सुधाकर अहिरे यांचे शेत आहे. या शेतात सेंधवा येथील सुभानिया देवचंद आर्य हे पत्नीसह शेतात सालदारकी करतात. त्यांना पाच मुली व मुलगा असा परिवार. यापैकी चार मुली व मुलगा हे सायंकाळी शेताजवळच असलेल्या केटी वेअर परिसरात खेळण्यास गेली होती. त्यावेळी यापैकी बहिणी व भाऊ बुडत असल्याचे पाहून त्यांच्यासोबत असलेल्या मोठ्या बहिणीने आरडाओरड केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने पोहचत बालकांचे मृतदेह बाहेर काढले.
या बालकांचे मृतदेह रात्रीच चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदार करंबेळकर यांनी शवविच्छदन केले.