जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूचेही वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल लवकर मिळावे म्हणून एकूण तीन खाजगी लॅबशी करार करण्यात आला आहे. यातील एका लॅबकडून सध्या तपासणी करून घेतली जात असून या एका खाजगी लॅबकडून महिनाभरात जवळपास चार हजार तपासण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्या वाढल्यास करार केलेल्या इतर दोन खाजगी लॅबचीही मदत घेतली जाणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. ही चिंता वाढविणारी आकडेवारी पाहता गेल्या महिन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जळगाव येथे येऊन आढावा घेतला. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गास आळा बसण्यासाठी व मृत्यू रोखण्यासाठी अहवाल लवकर येणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार खाजगी लॅबकडूनही तपासण्या वाढविण्यात आल्या.अगोदर जळगावातील नमुने पुणे, नंतर धुळे येथे पाठविण्यात येत होते. मात्र त्यास विलंब होत असल्याने अहवाल लवकर मिळावे म्हणून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लॅब सुरू करण्यासह मुंबई येथील खाजगी लॅबशी करार करण्यात आला. त्यानुसार दोन्ही लॅब मिळून आतापर्यंत १६ हजार २०६ तपासण्या झाल्या असून त्यापैकी अडीच हजारावर रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुंबई येथील खाजगी लॅबशी महिनाभरापूर्वी करार करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत या लॅबकडून जवळपास चार हजार तपासण्या करण्यात आल्या.दररोज जिल्ह्यातील ४०० ते ५०० नमुने घेतले जात असून शासकीय लॅबमध्ये दररोज दीडशेच्यावर नमुन्यांची तपासणी केली जाते तर मुंबई येथील खाजगी लॅबकडून तेवढेच अहवाल येत आहे.साडेचारशे अहवाल प्रलंबितअहवाल लवकर आले पाहिजे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले असले तरी दररोज चारशे ते पाचशे अहवाल प्रलंबित राहत आहेत. यात २३ जून अखेरपर्यंत ४५४ अहवाल प्रलंबित होते.आणखी दोन लॅबशी करारमुंबई येथील खाजगी लॅबशी करार झाला तरीदेखील अहवाल प्रलंबित राहत असल्याने हे अहवाल लवकर मिळावे म्हणून आरोग्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. त्यानंतर पुणे येथीलही खाजगी लॅबशी करार करण्यात आला होता. आता पुन्हा नाशिक येथील लॅबशी करार करण्यात आला आहे.करार झालेल्या तीन खाजगी लॅबपैकी सध्या पुणे व नाशिक येथील लॅबकडून तपासणी करून घेतली जात नाही. मात्र आता रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून अहवालांची गती वाढविण्याचे नियोजन असल्याने या दोन्ही लॅबकडूनही तपासणी करून घेतली जाणार आहे.दररोज ४०० ते ५०० नमुने तपासणीसाठी पाठविले जात असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची लॅब व एका खाजगी लॅबकडून अहवाल येत आहे. यात पुणे व नाशिक येथीलही खाजगी लॅबशी करार करण्यात आले आहेत. चाचण्या वाढविल्यानंतर त्यांच्याकडूनही तपासणी करून घेतली जाणार आहे.- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.
जळगाव जिल्ह्यात खाजगी लॅबकडून चार हजार तपासण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:47 PM