अमित महाबळ, जळगाव : कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमांना येत्या सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या तयारीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरूवारी झालेल्या कार्यशाळेत सर्वांगीण चर्चा करण्यात आली. नवीन धोरणानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राहणार असून, त्याला ‘ऑनर्स’ पदवी म्हटले जाणार आहे.
अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने विद्यापीठाशी संलग्नित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिसभा सदस्य यांची कार्यशाळा घेण्यात आली. शासनाने नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात गठीत केलेल्या समितीचे सदस्य कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल राव, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. आर. डी. कुलकर्णी यांनी पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.
प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी शैक्षणिक धोरणाचा आराखडा कसा असेल यावर पॉवरपॉइंट सादरीकरण केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी परीक्षा पद्धतीविषयी तसेच प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी परीक्षा पद्धतीत शिक्षकांच्या योगदानाविषयी संवाद साधला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठ परीक्षांमधील आपली जबाबदारी याविषयावर मार्गदर्शन केले. येत्या महिन्याभरात शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत या धोरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. अनिल डोंगरे, सूत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले. अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी आभार मानले.
समस्या येतील, त्यावर तोडगा काढू
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना ज्या समस्या निर्माण होतील त्यावर तोडगा काढला जाईल. प्राध्यापकांच्या वर्कलोडमध्ये थोडा फरक पडेल. पारंपरिक विचार न करता नाविन्यपूर्ण केार्सेस तयार करावेत, असे यावेळी सांगण्यात आले. उच्च शिक्षणात अपेक्षित असलेले बदल या धोरणात असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी मानसिकता तयार करावी लागेल असे प्रा. आर.डी. कुलकर्णी म्हणाले.
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
- येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या श्रेयांक आणि अभ्यासक्रम आराखड्याची माहिती कार्यशाळेत देण्यात आली.- नव्या धोरणानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांपुढे असेल. त्याला ऑनर्स पदवी म्हटले जाईल.- तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम देखील कायम राहील. पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाईल. प्रत्येक विषयाचे क्रेडीट निश्चित केले जाईल.- शिक्षण सुरू असतांना विद्यार्थ्यांना मल्टीपल एन्ट्री आणि मल्टीपल एक्झिट काही अटींसह दिली जाईल. त्यासाठी सात वर्षांची मुदत दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर बाहेर पडतांना १० क्रेडीटची दोन महिन्यांची इंटर्नशिप आणि स्कील कोर्स करण्यासह आवश्यक क्रेडीट मिळवावे लागतील.
आधी प्रमाणपत्र, मग पदवी, त्यानंतर ऑनर्स पदवी
- चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षांनंतर प्रमाणपत्र दिले जाईल. परंतु किमान ४० आणि कमाल ४४ क्रेडीट गरजेचे आहेत.- दुसऱ्या वर्षानंतर म्हणजे चार सेमिस्टरनंतर डिप्लोमा प्रमाणपत्र (किमान ८० व कमाल ८८ क्रेडीट गरजेचे) दिले जाईल.- तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र (किमान १२० व कमाल १३२ क्रेडीट गरजेचे) दिले जाईल.- चौथ्या वर्षी आठ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर संशोधन किंवा स्पेशालायझेशन पूर्ण झाल्यानंतर ऑनर्स (किमान १६० व कमाल १७६ क्रेडीट गरजेचे) पदवी जाईल.- चौथ्या वर्षात प्रतीसत्र किमान २० क्रेडीटसह इंटर्नशिप आणि मुख्य विषय अभ्यासक्रमात असतील.- चार वर्षांची ऑनर्स पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तरसाठी एक वर्ष किंवा दोन सेमिस्टर पूर्ण करावे लागतील.
इतर कॉलेजमध्येही शिकू शकता
नवीन धोरणात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर विभाग करण्यात येतील. मायनर विभागात विद्यार्थ्यांना आपल्या शाखेच्या व्यतिरिक्त आवड असलेला विषय शिकता येईल. तो विद्यार्थी इतर महाविद्यालयातूनही आवडीचा विषय शिकू शकेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"