जळगाव : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्ती देऊन चार तरुणांची ५६ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक गयभु पाटील (रा. पिंपळेसिम ता. धरणगाव), कांतीलाल पंडीत पाटील, संदीप छोटू पाटील, दीपक मच्छिंद्र पाटील या तरूणांची तब्बल ५६ लाख रूपयात फसवणूक झाली आहे. त्यानुसार संशयित आरोपी दिनेश अशोक चौधरी, गजानन ऊखा राठोड, अजय पंजाबराव रामटोके, सनिकुमार अल्लखनिरंजनसिंग यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार
सन २०१८ मध्ये रेल्वे खात्यात ग्रुप डी पदासाठी जाहिरात निघाली होती. या पदांसाठी दीपक पाटील यांच्यासह कांतीलाल, संदीप आणि दीपक यांनी अर्ज भरले होते. त्या काळातच चौघांची दिनेश चौधरी व त्याचा मित्र गजानन राठोड यांच्याशी ओळख झाली. यवतमाळ येथील अजय रामटेके हा ओळखीचा असून त्याचे रेल्वेतील अधिका-यांशी चांगले संबंध आहे. बिहारचे सनीकुमार अल्लखनिरंजन यांच्या माध्यमातून ते तरूणांना रेल्वेत नोकरीला लावून देतात, असे दिनेश याने चौघांना त्यावेळी सांगितले. नंतर चार ते पाच दिवसांची दिनेश याने चौघांना जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील त्याच्या कार्यालयात बोलवून घेतले व रामटेके यांच्याशी बोलणे झाले असून नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येकी १४ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले.
पेपर न लिहिण्याचे सांगितले
दरम्यान, ३ डिसेंबर २०१८ रोजी तरूणांना रेल्वेच्या लेखी परीक्षेसाठीचे हॉल तिकिट प्राप्त झाले. त्यावेळी चौघांना दिनेशने पेपर न सोडविण्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी ऑनलाईन पेपर हा त्यांचा क्रमांक टाकून कोरा सोडला. त्यानंतर वेळोवेळी दिनेश व रामटेके याने तरूणांकडून पैसे घेतले. जानेवारी २०१९ मध्ये पटणा येथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नियुक्ती पत्र पाठविण्यात येईल, सांगितले गेले. ११ मार्च २०१९ रोजी अजय रामटेके हा पुन्हा जळगावात आल्यानंतर चौघा तरूणांनी १७ लाख ५७ हजार रुपये त्यास दिले. त्याच महिन्यात दीपक व कांतीलाल या तरूणांनी बिहार येथील सासाराम रेल्वे जंक्शन येथे प्रशिक्षण घेतले. पण, रेल्वे विभागाचा प्रशिक्षणात कुठलाही संबंध नसल्याचे त्यांना कळाले. डिसेंबर २०१८ मध्ये संदीप पाटील व कांतीलाल पाटील या तरूणांना धनबाद (झारखंड) येथील नियुक्तपत्र प्राप्त झाले. पण त्यांना कामावर घेतले गेले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळाले. त्यानंतर चौघांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली होती. या शाखेने चौकशी केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला.