लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात चौथ्या सिरो सर्व्हेला रविवार २० जूनपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील दहा गावे व जळगाव शहर या ठिकाणच्या काही निवडक नागरिकांचे रक्त नमुने संकलित करून किती टक्के लोकांमध्ये ॲन्टीबॉडी विकसित झाल्या आहेत, याची तपासणी या सर्व्हेतून पुन्हा एकदा होणार आहे. यासाठी आयसीएमआरच्या दहा जणांचे पथक जिल्ह्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. दोन दिवस हा सर्व्हे राहणार आहे.
गेल्या तीन सिरो सर्व्हेमध्ये जळगावात दुसऱ्या सर्व्हेत २५.९ टक्के नागरिकांमध्ये ॲन्टीबॉडी आढळल्या होत्या. त्यामुळे ५० टक्के लोकांमध्ये ॲन्टीबॉडी विकसित झाल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला होता. मात्र, तिसऱ्या सर्व्हेत कमी वाढ समोर आल्याने हा दावा फोल ठरला होता. शिवाय दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक समोर आल्याने या ॲन्टीबॉडीचे झाले काय, असाही प्रश्न समोर आला होता. आता नेमक्या किती लोकांमध्ये ही प्रतिकारक्षमता विकसित झाली आहे, हे या सर्व्हेतून समोर येणार आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक बाधित
पहिल्या लाटेत बाधितांची संख्या ही ५७,५९१ होती तर, दुसऱ्या लाटेत ८४,९८२ जण बाधित आढळून आले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ही संख्या अधिक वाढली, शिवाय हे बाधित तीन ते चार महिन्यातच समोर आले आहेत.
काय असतो सर्व्हे?
कोरोना संसर्गाचे जिल्ह्यात किती प्रमाण आहे. किती लोकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत, याची तपासणी करण्यात येते. यात साधारण ४०० जणांचे रक्त नमुने संकलित करून ते चेन्नई व पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. काही दिवसांनी याचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यानुसार संसर्गाचे प्रमाण समोर येत असते. यानुसार पुढील दिशा ठरविली जाते.